‘दुर्बोध निकालपत्र वाचल्यावर डोक्याला टायगर बाम लावला’

SC - HC - Maharastra Today
  • सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाच्या क्लिष्ट निकालाचे वाभाडे

नवी दिल्ली : ‘हे निकालपत्र एवढे क्लिष्ट आणि अगम्य आहे की पुन्हापुन्हा वाचूनही त्यातून काही अर्थबोध होत नाही.  मी तर हे निकालपत्र वाचून झाल्यावर कपाळाला टायगर बाम लावला’, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एम. आर. शहा यांनी हिमाचल  प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचे तोंडी वाभाडे काढले.

केंद्र सरकारच्या एका कर्मचाºयास गैरवर्तनाच्या आरोपावरून बडतर्फ केल्याचे हे प्रकरण होते. केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरणाने या कर्मचाºयाची बडतर्फी योग्य ठरविली होती. त्या निकालावर शिक्कामोर्तब करताना उच्च न्यायालयाने हा निकाल दिला होेता. हे निकालपत्र ज्या पद्धतीने लिहिले होते त्याबद्दल खंडपीठावरील न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एम. आर. शहा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

एवढेच नव्हे तर हल्ली अशा प्रकारची अगम्य निकालपत्रे वारंवार दिली जात असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.निकालपत्रे कशी लिहावीत आणि कशी लिहू नयेत, याचे धडेही आता आम्ही इथे बसून द्यायचे की काय?, असा प्रश्नही न्यायमूर्तींनी विचारला.

अशा प्रकारची निकालपत्रे लिहिणे म्हणजे न्यायाची थट्टा आहे, असे सांगत न्या. चंद्रचूड म्हणाले, मी स. १०.१० वाजता हे निकालपत्र वाचायला सुरुवात केली आणि १०.५५ वाजता ते वाचून संपविले. पण सर्व १८ पाने वाचल्यावरही त्या विद्वान न्यायाधीशांना नेमके काय म्हणायचे आहे, हे मला अजिबात कळले नाही. शेवटी मी औद्योगिक न्यायाधिकरणाचे मूळ निकालपत्र वाचले तेव्हा थोडेफार समजले. त्यांना दुजोरा देत न्या. शहा म्हणाले, मलाही वाचून काही कळले नाही. मध्येच कुठे तरी स्वल्पविराम टाकून लिहिलेल्या लांबच लांब वाक्यांवरून काहीच अर्थबोध होत नाही. खरं सांगायचे तर माझ्याच आकलन शक्तीबद्दल मला शंका येऊ लागली. शेवटी मी (कपाळाला) टागयर बाम लावला!

आदर्श निकालपत्र कसे असावे यासंदर्भात न्या. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. व्ही. आर. कृष्ण अय्यर यांच्या निकालपत्रांचा उल्लेख केला. न्या. चंद्रचूड म्हणाले की, त्यांची निकालपत्रे भाषेच्या वैभवाने नटलेली असत. पण त्या भाषेच्या फुलोºयातूनही प्रगाढ बुद्धिमत्ता व गहन विचार व्यक्त होत असे.

निकालपत्र कसे असावे?

निकालपत्र कसे असावे याचे विवेचन करताना न्या. चंद्रचूड म्हणाले: न्यायाधीश जो निकाल देतात त्यातील निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची त्यांची विचारप्रक्रिया सांगण्यासाठी निकालपत्र लिहायचे असते. निकालपत्रे साधी, सोपी आणि सुटसुटीत असायला हवीत. ती केवळ वकिलांना समजून उपयोग नाही. तर ज्या सामान्य लोकांना आपले हक्क बजावून घेण्यासाठी न्यायालयात यायचे असते त्यांनाही ती समजायला हवीत. निकालपत्रे तशी नसतील तर न्यायाचे दरवाजे सर्वांना खुले करण्याच्या मार्गातील तो मोठा अडथळा ठरेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER