सातारा महामार्गावर मद्यधुंद चालकाचा थरार : तीन वाहनांना धडक

accident

सातारा : साताराजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर आज सोमवारी सकाळी नऊ वाजता टेम्पोंसह अन्य तीन वाहनांना धडक देऊन मद्यधुंद कंटेनर चालकाने थरार निर्माण केला. महामार्ग पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले. विनयकुमार (वय ३०, रा. रसूलबार, कानपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मद्यधुंद कंटेनर चालकाचे नाव आहे. संजय सदा ( वय ३०), शशिकांत चौहान (वय ३१), राजेश सदा (वय २०) व अनिल सदा (वय ३६, सर्व रा. रायगाव, ता. जावली) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे बंगळूर महामार्गावर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेला एक कंटेनर निघाला होता. या कंटेनरने भरधाव वेगात शेंद्रे तालुका सातारा गावच्या हद्दीत पुढे निघालेल्या टेम्पाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील चौघेजण जखमी झाले. त्यानंतरही चालकाने कंटेनर न थांबविता पुढे भरधाव वेगात नेला. पुढे नागठाणे गावच्या हद्दीत या कंटेनरने इतर दोन वाहनांना धडक दिली.

दरम्यान ही बाब ड्युटीवर निघालेल्या बशीर मुल्ला व सिकंदर लांडगे या महामार्ग पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी महामार्गावर वेडावाकडा परंतु भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरचा खाजगी वाहनातून पाठलाग केला. तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने कंटेनर चालकाला पकडून ताब्यात घेतले. यावेळी त्याने मद्य सेवन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच त्याचे नाव विनयकुमार असे असल्याचे सांगितले. महामार्ग पोलिसांनी संबंधित मद्यधुंद कंटेनर चालकाला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास बोरगाव पोलिस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER