तीन चाकी रिक्षा आणि तिचा बदलता वेग…

amit shah & Uddhav Thackeray

Shailendra Paranjapeदेशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातले सरकार हे तीन चाकी रिक्षासारखे असून या रिक्षाची तीनही चाके तीन दिशांना जाताना दिसताहेत, असे विधान केले आहे. अशाच प्रकारचे विधान यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केले होते. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारमधले हे अंतर्विरोध पुन्हा उफाळून समोर आले आहेत.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत. करोनाचे संकट काहीसे निवळण्याच्या बेतात असताना आणि राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन तोंडावर असताना पटोले यांनी राजीनामा दिल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या महाआघाडी सरकारमधल्या इतर दोन्ही घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांच्या राजीनाम्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, अशी या दोन्ही पक्षांची भावना आहे.

सर्वात मुरब्बी समजले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पटोले यांच्या राजीनाम्यावर इंटरेस्टिंग प्रतिक्रिया लगेचच दिली होती. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद आता खुले झाले आहे, असं विधान पवार यांनी केलं होतं. मात्र, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना मात्र पवार यांनी विधानात बदल केलाय. आघाडी सरकार चालवताना मुख्यमंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्षपद एखाद्या पक्षाकडे असेल तरी त्यात बदल करताना इतर पक्षांशी चर्चा करायला हवी, त्यांचाही विचार घ्यायला हवा, अशी भाषा पवार यांनी शनिवारी वापरलीय. त्याचाच अर्थ हा की कॉँग्रेसने समजून उमजून हे पाऊल टाकलेय आणि पटोले यांच्यासारखा आक्रमक नेता प्रदेशाध्यक्षपदी ठरवूनच आणलाय.

पवार यांच्या विधानावरून हेही लक्षात येतेय की, पवारसाहेब सध्या तरी भाकरी फिरवण्याच्या मूडमधे नाहीत. भाकरी जास्ती वेळ तव्यावर ठेवली की ती करपते, या अर्थाने राजकीय घडामोडींमधे पवारसाहेब भाकरी फिरवण्याचा वाक्प्रयोग करून बदल करण्याचा संकेत अनेकदा देत असतात. फडणवीस यांनी विधान सभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो, असे विधान कल्यानंतर काहींच्या भुवया वर झाल्या होत्या. पण मुळात विधानसभेतले पक्षीय बलाबल लक्षात घेता आणि अपक्षांची संख्याच नसल्याने शिडी मिळणेही अवघड आहे आणि फासे पलटणेही अवघडच वाटतेय.

भारतीय जनता पक्षावर टीका करताना मावळते कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचे केलेले कौतुक लक्षात घेता सध्या तरी ना कॉँग्रेसची ना राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याची इच्छा आहे, असेच दिसते. त्यामुळे नवा विधान सभा अध्यक्ष हा कॉँग्रेसचाच होईल, यात शंका नाही. मात्र, तो तसा होऊ देताना राष्ट्रवादी आणि शिवसेना कॉँग्रेसला हा घास सहजी गिळू देणार नाहीत, असेही जाणवते. थोडेसे ताणून मग ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे केली जाईल.

मात्र, पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यावर म्हणजे येत्या शुक्रवारी त्यांनी रीतसर पदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते टोकदार शेरेबाजी करू शकतात आणि त्यांची नियुक्तीच मुळात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन केलेली असल्याने पावसाळ्यानंतर खरे फटाके फुटण्यास सुरुवात होईल, असे वाटते. त्यातून २०२२ हे महापालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने आणि दहा महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीतच असल्याने येत्या पावसाळ्यानंतर खरी धुमश्चक्री सुरू होईल. त्यादृष्टीने विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यावरून सुरू झालेली परस्परटीका हे पेल्यातलेच वादळ असेल पण ते घरभर पसरते का, हे येत्या गणेशोत्सव आणि दिवाळीच्या वेळीच समजेल. तोपर्यंत तीन चाकी रिक्षा अधून मधून चाकं एकत्र आणून वाटचाल करत राहील ताशी तीस किलोमीटरच्या वेगाने.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER