तीन शहरात तीन लशी, काही प्रश्न उराशी…

Corona Vaccine

Shailendra Paranjapeपंतप्रधान नरेन्द्र मोदी (Narendra Modi)यांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांना भेट देऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसनिर्मितीच्या कामाची माहिती घेतलीय. पुण्यात त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) भेट दिली. मुळात ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधनावर आधारित लस अँस्ट्राझेनिका ही कंपनी तयार करणार, त्याची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटही करणार, असं प्रसारमाध्यमातल्या बातम्यांवरून समजत आहे.

या सर्व प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्यांवरून मनात अनेक शंका निर्माण होतात. त्या शंकांचं निराकरण होण्याची गरज आहे. सिरम इन्स्टिट्यूट नेमके काय करत आहे, हे पंतप्रधानांनी बघितले आहे पण सर्वसामान्यांना हे सारं कळायला कठीण आहे. तीन शहरात तीन कंपन्यांच्या लशी बनत आहेत. रशियानं (Russia) तयार केलेल्या लशीसंदर्भात तिथल्या कंपनीनं अँस्ट्राझेनिकाला ऑफर दिल्याचं वृत्त प्रसारित झालंय की लशीच्या परिणामकारकतेसाठी तुमच्या दोन डोसबरोबर आमचाही एक डोस द्या.

दुसरीकडे लंडनहून (London)आलेल्या बातम्यांमधे असं आलंय की अजूनही चाचण्यांची गरज आहे आणि काही तज्ज्ञांनी कोविशिल्ड लशीच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचंही बातम्यांमधून समोर आलंय. त्यात सिरम इन्स्टिट्यूटनं जोखीम पत्करून कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार केले आहेत, अशी बातमीही प्रसारमाध्यमांमधून आलीय.

मुळात सप्टेंबरमधे भारती हॉस्पिटल, ससून रुग्णालय अशा ठिकाणी मोजक्या व्यक्तींना लस टोचून चाचणी घेण्यात आलीय. या चाचणीच्या अंतिम परिणामांसाठी १८० दिवस लागतील, असं त्यावेळी प्रसारित झालेल्या बातम्यांमधे नमूद करण्यात आलं होतं. याचा अर्थ किमान मार्च २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी थांबायला लागेल आणि लशीचे काही विपरित परिणाम होत नाहीत ना, हे समजू शकेल, असं सांगितलं गेलं होतं.

लशीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह असल्याच्या बातम्या येतात, लस ज्यांना टोचलीय त्यांच्या प्रकृतीवर नेमका काय परिणाम झालाय, हे अद्याप समाजाला अधिकृतरीत्या समजू शकलेलं नाही. एका खासगी कंपनीचं काम सुरू असल्यानं वृत्तपत्रातून त्याच्या बातम्या आल्या तरी फार काही विचारता येत नाही. पण आता पंतप्रधानांनी स्वतः येऊन माहिती घेतलीय तर किमान अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीनही शहरात सुरू असलेल्या लसनिर्मितीच्या कामाची किमान स्वयंस्पष्ट माहिती समाजाला समजायला हवी, ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.

मुळात सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत का, याची माहितीही समाजाला मिळण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधानांनी पुण्यात लसनिर्मितीची माहिती घेतली आणि शास्त्रज्ञांशी चर्चा केली, असं आकाशवाणीच्या करोनाविषयक सरकारी बातमीपत्रामधे नमूद करण्यात आलंय. लशीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह असतानाही लसनिर्मिती कशी काय होऊ शकते, नागरिकांना लस दिली जाईल तेव्हा ती पूर्णपणे सुरक्षित असेल काय, कारण आज जगभरातून येणाऱ्या बातम्या बघितल्या तर कोविशिल्डच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह आहे. असं असेल तर पंतप्रधानांनी नेमकी काय माहिती घेतली हे देशाला समजू शकेल काय…

दुसरीकडे प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर लस साठवण क्षमता विकसित करायचं जाहीर केलंय. मुळात लस कोणती घ्यायचीय, ती विकसित करायचं काम संपलंय का, ती पूर्ण सुरक्षित आहे का, हे सारं आजही समजू शकलेलं नसताना प्रशासनानं लससाठवणीची क्षमता विकसित का करावी… लस विकत घेण्याचा किंवा सरकारनं नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय का…

जगभरात लसविकसनाचे प्रयत्न सुरू आहेत. लशीच्या किमतीबाबतही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे घरात साधी भाजी विकत घेताना दहा-वीस रुपयांच्या पालेभाजीच्या गड्डीबाबत घासाघीस केली जाते तर देशभरातल्या १३५ कोटी भारतीयांना एखादी लस टोचायची असेल तर जगातली सर्वोत्तम प्रभावी, किफायती असायला नको का…

पंतप्रधान नरेन्द्र मोदी स्वतः तीनही शहरांना भेट देऊन गेलेत. त्यामुळे लोकसभेच्या तीनशेहून जास्ती जागा जिंकून आलेलं मायबाप केंद्र सरकार योग्य तो निर्णयच घेईल, यावर विश्वास ठेवू या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER