विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणारे ‘ते’ तीन प्राध्यापक निलंबित

अमरावती :- जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारे संचालित महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात १३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात पुढाकार घेणा-या तीन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. टेंभुर्णा येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात देण्यात आलेल्या प्रेमविवाहाबाबतच्या शपथेने वादळ उठले होते. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे.

अमित शहा राजीनामा देतील?

ही शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान, या संपूर्ण वादाची गंभीर दखल घेत अखेर १३ दिवसांनंतर संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या तीन प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे. विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या सूचनेवरून संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांनी ही कारवाई केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी. पी. दंदे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी एक सदस्यीय चौकशी समितीही नेमण्यात आली आहे.

महाविद्यालयात कोणतेही नियमबाह्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही संस्थाध्यक्षांनी बजावले आहे. ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर शिबिरात प्रा. प्रदीप दंदे यांनी मार्गदर्शन केले होते. यात आजच्या युवकांपुढील आव्हाने त्यांनी विशद केली. मुलींवरील वाढते अत्याचार हे एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. हे थांबायला हवे, असे ते म्हणाले. ‘आईबाबांवर विश्वास नाही का? त्या तुमचे लग्न योग्य मुलाशी करून देणार नाही का?’ असे प्रश्न करीत त्यांनी प्रेमविवाह न करण्याचीही शपथ यावेळी विद्यार्थिनींना दिली होती.