अंतिम आठमध्ये पहिल्यांदाच तीन माता खेळाडू; सेरेना, अझारेंका व पिरोन्कोव्हाने घडवला इतिहास

यंदाच्या यूएस ओपन टेनिस (US open tennis) स्पर्धेत उपांत्यपूर्व (Quarter final) फेरीत पोहचलेल्या आठ खेळाडूंपैकी तीन खेळाडू ‘माता’ (mothers) आहेत आणि टेनिसमध्ये १९६९ नंतर खुले सामने सुरू झाल्यापासून प्रथमच असे घडले आहे. तीन वर्षांच्या मॅटर्निटी ब्रेकनंतर मैदानात परतलेली स्वेताना पिरोन्कोव्हा (Tsvetana Pironkova) , व्हिक्टोरिया अझारेंका (Victoria Azarenka) आणि २४ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात असलेली सेरेना विल्यम्स (Serena Williams) या त्या तीन खेळाडू आहेत. मात्र यापैकी कुणी दोनच उपांत्य फेरी गाठू शकणार आहेत; कारण आता सेरेनाचा सामना पिरोन्कोव्हाशीच आहे.

सेरेनाचे सामने बघायला तिची मुलगी ऑलिम्पिया ही सध्या स्टेडियममध्ये हजर असते आणि प्रत्येक सामन्यात या मायलेकी एकमेकांना हात हलवून प्रोत्साहन देत असतात. अझारेंका ह्या यूएस ओपनमध्ये खेळण्याआधी नॉदर्न व सदर्न ओपन जिंकली; पण त्याआधी वर्षभरात एकही सामना जिंकलेली नव्हती. तर पिरोन्कोव्हा तर २०१७ पासून टेनिस कोर्टपासून लांबच होती. या तिघींचेही मातृत्वानंतरचे पुनरागमन विलक्षण आहे. तशा यंदाच्या यूएस ओपनमध्ये सहभागी झालेल्या केवळ या तीनच माता नव्हत्या तर एकूण नऊ माता होत्या. त्यात माजी विजेती किम क्लायस्टर्स, व्हेरा झ्वोनारेव्हा, तातयाना मारिया, कॅटरिना बोंदारेंको, पैट्रिशिया मारिया टिग व ओल्गा गोवोरत्सोव्हा यासुद्धा होत्या, ज्यांचे आव्हान आधीच संपले आहे.

व्हेरा झ्वोनोरोवाचे दुहेरीत मात्र आव्हान टिकून असून ती उपांत्य सामन्यात खेळणार आहे. यापैकी कुणीही विजेती ठरली तर टेनिसच्या खुल्या सामन्यात ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेती ठरलेली ती केवळ चौथीच ‘आई’ ठरेल. याआधी मार्गारेट कोर्ट, इव्हान गुलागाँग व किम क्लायस्टर्स या ‘आई’ विजेत्या आहेत आणि सेरेनाने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तेव्हा ती गर्भवती होती; पण ‘आई’ बनल्यानंतर ती ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकलेली नाही. विम्बल्डन व यूएस ओपन या दोन्ही स्पर्धात ती गेल्या दोन वर्षांपासून अंतिम फेरीत येतेय; पण विजेतेपदाची ट्रॉफी काही तिच्या हाती लागत नाही. माता खेळाडूंबद्दल सेरेना म्हणते की, एवढ्या माता खेळाडू बघून आनंद वाटतो.

मी स्वतः आई असल्यामुळे असेल कदाचित; पण मला या आईंबद्दल अतीव आदर आहे. २०१७ मध्ये बाळंतपणानंतर अवघ्या सहा महिन्यांतच सेरेना मैदानावर परतली होती. अझारेंका ही दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती आहे. २०१६ मध्ये इंडियन वेल्स व मियामी येथील स्पर्धा लागोपाठ जिंकल्यावर ती गर्भवती असल्याने मैदानापासून दूर गेली. २०१६ च्या डिसेंबरमध्ये तिचा मुलगा लिओचे आगमन झाले आणि जून २०१७ मध्ये ती मैदानावर परतली आणि त्यानंतरच्या दुसऱ्याच स्पर्धेत म्हणजे विम्बल्डनमध्ये तिने चौथी फेरी गाठली.

त्याच वर्षी तिचा घटस्फोटही झाला आणि लिओच्या ताब्याच्या मुद्द्यावरून तिला न्यायालयीन लढाई लढावी लागली. याच तणावापायी ती सातत्याने स्पर्धा खेळू शकली नाही. परिणामी सातत्याअभावी तिचा खेळ घसरला. यंदा तर तिने निवृत्तीचाही विचार बोलून दाखवला होता; पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती जूनपासून पुन्हा मैदानावर उतरली. तेव्हापासूनच्या दोन-तीन स्पर्धात पहिल्याच फेरीत हरल्यावर तिने काही दिवसांपूर्वी वेस्टर्न व सदर्न ओपन स्पर्धा जिंकली. आई म्हणून माझे हे पहिले विजेतेपद आहे आणि म्हणूनच ते खास आहे असे ती म्हणाली होती. आता यूएस ओपनमध्ये मात्र तिने ओळीने चार सामने जिंकले आहेत.

या ठिकाणी तिच्यासोबत लिओ आणि तिची आई आहे. अझारेंकाचा उपांत्यपूर्व सामना आता बुधवारी एलीस मार्टेन्सशी आहे. तो जिंकला तर २०१३ नंतर ती प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचेल. २०१० ची विम्बल्डन उपांत्य फेरी गाठणारी पिरोन्कोव्हा ही २०१७ नंतर पहिलीच स्पर्धा खेळतेय. एप्रिल २०१८ मध्ये ती ऑलेक्झांडरची आई बनली आणि तिने रॅकेट बाजूला ठेवून दिली. तीन वर्षे टेनिसपासून दूर राहिल्यावर तिला पुन्हा हातात रॅकेट घेऊन मैदानावर उतरावे असे वाटायला लागले. ती जास्तीत जास्त स्पर्धा पाहू लागली, खेळाडूंची माहिती ठेवू लागली.

डोक्यात योजना बनवू लागली आणि कोणती स्पर्धा आपल्यासाठी योग्य ठरेल याचा विचार करू लागली. यंदा ११ मार्चला तिने मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आणि १२ मार्चपासून कोरोनामुळे टेनिसच्या सर्व स्पर्धा स्थगित झाल्या. मानांकन नाही, तीन वर्षांपासून स्पर्धा नाही; पण वुमेन्स टेनिस असोसिएशनने (WTA) नव्याने बनवलेल्या मॅटर्निटी ब्रेक नियमांनी तिला तिची ब्रेकआधीची क्रमवारी राखता आली आणि त्याआधारे ती यंदाच्या यूएस ओपनसाठी पात्र ठरली. अझारेंकाप्रमाणेच पिरोन्कोव्हानेसुद्धा पहिले तीन सामने सरळ सेटमध्ये जिंकले.

त्यात दोन वेळच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या गार्बाईन मुगुरुझा व १८ व्या मानांकित डोना व्हेकिचवरील विजयाचा समावेश आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने मुलाला दिले आहे. आई बनल्याबद्दल ती म्हणते की, आई बनल्यावर सर्वच बदलते. तुमच्या प्राधान्याच्या गोष्टी बदलतात. पूर्वीसारखे काहीच राहात नाही; पण मला खेळताना तो बघतोय याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा नाही. आता मला कसंही करून सामना जिंकायलाच पाहिजे असे दडपण नसते तर मी खेळाचा आनंद घेतेय. पिरोन्कोव्हाचा पुढचा सामना आता बुधवारी दुसरी आई खेळाडू ग्रेट सेरेना विल्यम्सशी आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत खुल्या स्पर्धेत दोन माता खेळाडूंदरम्यानचा हा पहिलाच उपांत्यपूर्व सामना असेल.

सेरेनाशी होणाऱ्या सामन्याबद्दल ती म्हणते की, अशा महान आणि यशस्वी खेळाडूशी सामना खेळायला मिळणे हे भाग्य आहे. मला या सामन्याची उत्सुकता आहे; कारण या सामन्यात आम्हा दोघींसाठी भावना खासच असतील. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. अझारेंका म्हणते की, आमच्याकडे केवळ ‘माता’ म्हणून बघू नका, आम्ही आई असण्यासोबतच टेनिस खेळाडूही आहोत. आमचीसुद्धा ध्येये आहेत, स्वप्ने आहेत.

आमच्याही प्रायोरिटी आहेत आणि आई बनल्यावर तर कुठे माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. मातृत्व आणि खेळ यांचा समन्वय साधत ज्या आपल्या स्वप्ने पूर्ण करतील त्या माझ्यासाठी हिरो आहेत. त्या सर्वांचा मी सन्मान करते. यातून इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे. मला जे वाटते ते मी करतेय. ही माझ्या मुलासाठीसुद्धा प्रेरणा देणारी गोष्ट आहे. माझ्या मुलासाठी मला एक उदाहरण बनायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER