यू. एस. ओपनमध्ये दोन माता जिंकल्या; एक हरली

Serena Williams-Viktoria Azarenka-Kim Clijsters

यू. एस. ओपन टेनिस (US open Tennis) स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मंगळवारी तीन माता (Mother) खेळाडू खेळल्या- सेरेना विल्यम्स (Serena Williams), व्हिक्टोरिया अझारेंका (Viktoria Azarenka) व किम क्लायस्टर्स (Kim Clijsters) . यापैकी सेरेना व व्हिक्टोरियाने पुढच्या फेरीत आगेकूच केली आहे; मात्र माजी विजेती व माजी नंबर वन क्लायस्टर्सचे पुनरागमन अपयशी ठरले आहे.

सेरेनाने स्थानिक खेळाडू क्रीस्टी आन हिला ७-५, ६-३ अशी मात देत आपल्या २४ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अझारेंकाने बार्बरा हास हिचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. किम क्लायस्टर्स हिला मात्र एकाटेरिना अॕलेक्झांड्रोव्हा हिच्याकडून ३-६, ७-५, ६-१ अशी हार पत्करावी लागली. तीन वेळच्या क्लायस्टर्सचा हा निवृत्तीतून बाहेर येत पुनरागमनाचा सामना होता.

सहा वेळच्या यू. एस. ओपन विजेत्या सेरेनाने या स्पर्धेतील आपला १०२ वा सामना जिंकला. यासह तिने ख्रिस एव्हर्टचा या स्पर्धेतील सर्वाधिक सामने जिंकायचा विक्रम मागे टाकला.

तिसऱ्या मानांकित सेरेनाची सुरुवात खराब झाली; पण पुढे आपला खेळ उंचावत तिने १ तास २१ मिनिटांत सामना संपवला. यात तिने तब्बल १३ एसेस लगावल्या. सामन्यानंतर ती म्हणाली की, पहिल्या फेरीचा सामना माझ्यासाठी नेहमीच कठीण जातो. क्रीस्टी खरोखर चांगली खेळली. तिच्या खेळात वैविध्य होते. त्यामुळे ती पुढचा फटका काय खेळणार याचा अंदाज येणे कठीण होते. एक वेळा तर मी पीछाडीवर होते. तिने खरोखर मला संघर्ष करायला लावला.

सेरेनाचा सामना आता मार्गारिटा गास्पारियानशी आहे. सेरेना गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होत आहे.

२१ व्या मानांकित एकाटेरिना अॕलेक्झांद्रोव्हा हिने तीन वेळच्या माजी विजेत्या किम क्लायर्स्टर्सचे यशस्वी पुनरागमनाचे स्वप्न उद्ध्वस्त केले. किम ही २०१२ नंतरचा आपला पहिलाच सामना खेळत होती. मात्र तिला ६-३, ५-७, १-६ असा पराभव पत्करावा लागला.

या विजयाबद्दल एकाटेरिना म्हणाली की, हा विजय खास आहे; कारण ती अतिशय सफल खेळाडू आहे, आणि तिला मी हरवले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. हा फार चांगला अनुभव होता आणि मी खूश आहे. हा सामना १ तास ४५ मिनिटांत आटोपला.

तीन मुलांची आई असलेली क्लायस्टर्स ही २०१२ च्या यू. एस. ओपननंतर निवृत्त झाली होती. त्यानंतर तिचा हा पहिलाच ग्रँड स्लॅम सामना होता. तिला वाईल्ड कार्डने या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता.

बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने प्रभावी सुरुवात करताना बार्बरा हास हिचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. तिने गेल्याच आठवड्यात वेस्टर्न व सदर्न ओपन स्पर्धा जिंकली आहे.

दोन वेळच्या उपविजेत्या अझारेंकाचा सामना आता सलग दुसऱ्या वर्षी पाचव्या मानांकित, एरिना साबालेंकासोबत आहे. गेल्या वर्षी या दोघींचा पहिल्या फेरीतच सामना झाला होता. त्यात साबालेंकाने तीन सेटमध्ये विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER