१२ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचे तीन फलंदाज झाले धावबाद

Three indians runout

आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India Vs Australia) तिसऱ्या कसोटीत भारताचे तब्बल तीन फलंदाज पहिल्या डावात धावबाद (Runouts) झाले. हनुमा विहारी (Vihari) ४ धावांवर, रविचंद्रन अश्विन (Ashwin) १० धावांवर आणि जसप्रीत बुमरा (Bumrah) एकही धाव न करता धावबाद झाला. यामुळे भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे काम सोपे करत असल्याची चर्चा आहे आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाअखेर आघाडी मिळण्यास हेच कारणीभूत ठरले आहेत. भारतीय डावात तीन फलंदाज धावबाद होण्याची गेल्या १२ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. याच्याआधी २००८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मोहाली कसोटीत तीन जण धावबाद झाले होते.

त्यावेळी सेहवाग, लक्ष्मण व युवराजसिंग धावबाद झाले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका डावात तीन किंवा अधिक फलंदाज धावबाद होण्याची ही सातवी वेळ आहे. याआधीचे असे सहाच्या सहा सामने भारताने गमावले आहेत. मात्र आधीच्या सहा वेळा तीनपैकी एका तरी फलंदाजाने १० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यावेळी पहिल्यांदाच तिन्ही फलंदाज १० पेक्षा कमी धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत आतापर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर आता हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह धावबाद झाले आहेत. यापैकी रहाणे, अश्विन व बुमरा यांच्या धावबाद होण्यावेळी रवींद्र जडेजा हा नाॕन स्ट्रायकर होता. त्यामुळे जडेजा खेळपट्टीवर असताना समोरच्या फलंदाजाला अधिक चपळ व अधिक जलद असायला हवे हे दिसून येते.

रवींद्र जडेजा आणि धावबादबाबत उल्लेखनीय बाब ही की, तो २० वेळा धावबाद होण्यात भागीदार राहिला आहे. सात वेळा तो स्वतः तर १३ वेळा त्याचे साथीदार धावबाद झाले आहेत. धावबादचे विक्रम कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक धावबाद होण्याचा विक्रम चार फलंदाजांचा आहे. १९५५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पेशावर कसोटीत भारताचे चार फलंदाज धावबाद झाले होते आणि त्यानंतर १९६९ मध्ये विंडीजविरुद्धच्या अॕडिलेड कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज धावबाद झाले होते. कसोटी सामन्यांमध्ये एका डावात तीन किंवा अधिक फलंदाज धावबाद होण्याची ही एकूण ३७ वी वेळ होती. या ३७ मध्ये ऑस्ट्रेलियाने चार वेळा असे फलंदाजांना धावबाद (१९०२, १९७२, १९९१ व २०२१) पकडले आहे. मात्र याच ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन तीन फलंदाज सर्वाधिक ८ वेळा, भारताचे ७ वेळा, वेस्ट इंडिज व झिम्बाब्वेचे प्रत्येकी ४ वेळा आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानचे, प्रत्येकी ३ वेळा धावबाद झाले आहेत.

भारतापुरते बोलायचे झाले तर एका डावात सर्वाधिक भारतीय फलंदाज धावबाद झालेले सामने असे :

४- विरुद्ध  पाकिस्तान, १९५५
३- विरुद्ध  वेस्ट इंडिज, १९५३
३- विरुद्ध  वेस्ट इंडिज, १९७१
३- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९९६
३- विरुद्ध  श्रीलंका, २००१
३- विरुद्ध  इंग्लंड, २००८
३- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER