देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या चित्रपटासाठी एकत्र

Deol Family

बॉलिवूडमध्ये  (Bollywood)एकाच कुटुंबातील तीन पिढ्या एकाच चित्रपटात काम करण्याची घटना फार दुर्मिळ आहे. बॉलिवुडवर गेल्या अनेक दशकांपासून कपूर खानदान राज्य करीत आहे. परंतु कपूर खानदानाच्याही तीन पिढ्या कधी एका चित्रपटात दिसू शकल्या नव्हत्या. मात्र हा मान आता देओल कुटुंबाला (Deol family)मिळणार आहे. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने सनी देओलने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात धर्मेंद्र, सनी आणि बॉबीसोबत सनीचा मुलगा करण देओलही काम करणार आहे.

यापूर्वी धर्मेंद्रने सनी आणि बॉबीसोबत अनेक चित्रपट केलेले आहेत. याची माहिती काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला दिली होतीच. मात्र तीन पिढ्या एकत्र काम करण्याचा मान देओल कुटुंबाला इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते. दिग्दर्शक अनिल शर्माने 2007 मध्ये धर्मेंद्र, सनी आणि बॉबीला घेऊन अपने चित्रपट सादर केला होता. स्वतः धर्मेंद्रनेच या चित्रपटाची निर्मिती केली होती. देओल पिता-पुत्रांचा हा कौटुंबिक ड्रामा प्रेक्षकांनी डोक्यावर गेतल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरली होता. यानंतर सनीने यमला पगला दीवाना सीरीजमध्ये तीन चित्रपट तयार केले ज्यात या तिघांनी काम केले होते. प्रेक्षकांमध्ये देओल कुटुंबाविषयी प्रेम असल्याने त्यांचे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी होतात.

सनीने मुलगा करणसाठी ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाची निर्मिती केली होती. परंतु करणला मात्र प्रेक्षकांनी स्वीकारले नव्हते. त्यामुळेच करणला आजोबा आणि काकासोबत पडद्यावर आणण्याचा विचार सनीने केला असावा असे म्हटले जात आहे. सनीने गुरुनानक जयंतीच्या शुभ मुहुर्तावर ‘अपने 2’ चित्रपटाची घोषणा केली आहे. मात्र यावेळी फक्त निर्मितीचाच विडा सनीने उचलला असून दिग्दर्शनाची जबाबदारी त्याचा आवडता दिग्दर्शक अनिल शर्मावरच सोपवली आहे. ट्विटद्वारे या चित्रपटाची माहिती देताना सनीने म्हटले आहे, बाबाजीची आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमामुऴे आम्ही पुन्हा एकदा एकत्र येत आहोत. वडिल आणि भावासोबत यावेळी माझ्या मुलासोबत काम करण्याची संधी मला मिळत असल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पुढील वर्षी मार्चपासून ‘अपने 2’ चे शूटिंग सुरु केले जाणार असून पुढील वर्षी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना सनीने आखली आहे.

धर्मेंद्रनेही सनीचे ट्विट शेअर करीत म्हटले आहे, मेरे अपनों. जोपर्यंत देवाची कृपा आहे तोपर्यंत आपण एकत्रच चालत राहू. ‘अपने 2’ तून देओल्स कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र येत आहेत. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावरच आम्ही ‘अपने 2’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे असेही धर्मेंद्रने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER