नागपुरात तीन तलाक दिल्यामुळे गुन्हा दाखल; शहरातील पहिलेच प्रकरण

नागपूर : पत्नीला पोस्टकार्ड पाठवून तीन तलाक देणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हे शहरातील पहिले प्रकरण आहे. अशर मोबीन मदनी असे आरोपीचे नाव आहे. तो प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. त्याचे ऑक्टोबर २०१३ मध्ये कुदसियाशी लग्न (निकाह) झाले होते. कुदसियाला चार आणि दोन वर्षे अशा दोन मुली आहेत.

कुदसियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती अशर मोबीनला दारू, मादक पदार्थ आणि इतर वाईट सवयी आहेत. त्यामुळे अशर तिला यातना देत होता. तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर यातनात आणखीनच वाढ झाली. तो मुलाला जन्म दिला नसल्यामुळे नेहमीच टोमणे मारत होता. मे २०१८ मध्ये अशर तिला सोडून निघून गेला. तो आपल्या आईसोबत वेगळा राहू लागला. कुदसिया आपल्या मुली आणि आजीसोबत राऊत ले-आऊटमध्ये राहु लागली. २९ जूनला अशरफने स्पीड पोस्टने कुदसियाला तीन तलाक चे पत्र पाठविले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुदसियाला स्पीड पोस्ट प्राप्त झाले. ते वाचून कुदसिया अवाक् झाली. तणावात असल्यामुळे तिने तक्रारही दाखल केली नाही. कुटुंबीयांना अशरने तलाक दिल्याचे सांगितले. त्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुदसियाच्या तक्रारीच्या आधारावर अशरला नोटीस जारी केली.

अशरने कुदसियाला तीन तलाक दिल्याचे कबूल केले होते. त्या आधारावर मानकापूर पोलिसांनी अशरच्या विरुद्ध मुस्लिम विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जुलै महिन्यात तीन तलाकचे बिल पास झाले. त्यानुसार मुस्लिम समाजात पतीद्वारा पत्नीला तीन तलाक देणे गुन्हा आहे. हा कायदा १ ऑगस्टपासून लागू झाला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर शहरातील हे पहिले प्रकरण आहे. पोलिसांनी अशरला अद्याप अटक केली नाही.