पायधूनी आणि जोगेश्‍वरीमध्ये तिन ड्रग्ज तस्करांना बेड्या

Drugs smugglers arrested

मुंबई : पायधूनी आणि जोगेश्‍वरीमध्ये पोलिसांनी कारवाई करत तिन ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी 1 किलो 13 ग्रॅम एमडीसह 5 हजार 640 नशेसाठी वापरण्यात येणार्‍या सीरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

पायधूनी पोलिसांनी सापळा रचून जुनैद हुसेन शेख याला 30 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 1 किलो 13 ग्रॅम एमडीसह अटक केली. पोलीस चौकशीमध्ये पायधूनीतील इसराईल मोहल्ला परिसरात राहात असलेल्या ड्रग्ज तस्कर परवेझ नसरुल्ला खान उर्फ चिंकू पठाण (38) याने त्याला पुरविल्याचे उघड झाले.

पोलीस पथकाने माग काढत डोंगरी पोलिसांनी पठाण याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पळ काढत पायधूनी गाठली. त्याच्या विभागातील नदीम खान उर्फ सोनू आणि जमाल खान उर्फ जोनू यांना बोलावून घेत पोलिसांशीच दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात करताच सोनू आणि जोनू यांनी पळ काढला. तर पोलिसांनी पठाणला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.

जोगेश्‍वरी पुर्वेकडील पास्कल कॉलनी परिसरात एक तस्कर कोडीन फॉस्पेट हा अंमली पदार्थ असलेल्या औषधांच्या बाटल्या विकत असल्याची माहिती मेघवाडी पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 47 बॉक्स आणि 2 हजार 300 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. बॉक्समध्ये 5 लाख 52 हजार 600 रुपये किंमतीच्या 5 हजार 640 बाटल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी जुबेर जुमानी उर्फ पप्पू (48) याला अटक केली आहे.