डी.एस.कुलकर्णीसह तिघांना अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

Arrest

सांगली : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सध्या चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या डीएसके ग्रुपच्या तिघांना सांगली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. यामध्ये डी.एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष अशा या तिघांचा समावेश आहे. कोर्टाने या तिघांनाही दि.१२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डीएसके ग्रुपच्या विरोधात दाखल असलेल्या सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर डीएसके ग्रुपच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

सांगली आणि परिसरातीलही गुंतवणूकदारांची सुमारे ४ कोटी २७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ६६ जणांचे जबाब नोंदविले आहेत. अद्यापही ज्यांची डीएसके ग्रुपकडून फसवणूक झाली आहे आणि त्यांनी अद्याप तक्रार दिलेली नाही,

अशा तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित दळवी, पोलीस उपनिरीक्षक विशाल भिसे यांच्या पथकाने दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दीपक कुलकर्णी आणि शिरीष दीपक कुलकर्णी ( रा.डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) यांना अटक केली आहे. मंगळवारी त्या तिघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिघांनाही दि.१२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.