पवार-प्रशांत किशोर यांच्यात साडेतीन तास चर्चा; पुढची रणनीती ठरली?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज भेट दिली. दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, या भेटीमागचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए-२ बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पवारांसोबत दुपारचं जेवणही केलं. या दोघांत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. या चर्चेत ठरवण्यात आलेल्या रणनीतीची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सिल्व्हर ओकवर बोलवण्यात आले होते. काही काळ जयंत पाटीलही चर्चेत सहभागी झाले होते. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरून या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार, प्रशांत किशोर भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा
  • देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार?
  • बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीवर चर्चा
  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरही चर्चा
  • पुढील काळात राष्ट्रवादीची रणनीती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button