पायल तडवी आत्महत्याप्रकरणातील तीन आरोपींना पुढे शिकण्याची मुभा

Payal Tadvi suicide case

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या (Payal Tadvi suicide) प्रकरणात आरोपी असलेल्या हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल या तीन डॉक्टरांना अर्धवट राहिलेला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (SC) परवानगी दिली. यासाठी या तिघींनी केलेला अर्ज न्या. उदय लळित, न्या. विनित शरण व न्या.अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने मंजूर केला. डॉ. पायल तडवी ही मुंबईतील  नायर वैद्यकीय महाविद्यालयात याच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती.

तेथील हॉस्टेलमध्ये तिने गेल्या २२ मे रोजी आत्महत्या केली होती. हॉस्टेलमध्ये ‘रॅगिंग’ करून तिला आात्महत्येस प्रवृत्त केल्याचा या तीन सहविद्यार्थिनींवर आरोप आहे. या तीन आरोपींना पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मुभा दिली तर त्या पुन्हा नायर इस्पितळातच जातील. त्यांच्याकडून साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने त्यांना परवानगी देऊ नये, असे म्हणत महाराष्ट्र सरकार, मुंबई  पोलीस व डॉ. पायलची आई आबेदा तडवी यांनी विरोध केला. मात्र  हा  विरोध अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फौजदारी न्यायप्रक्रियेत आरोपी दोषी ठरेपर्यंत त्यास निर्दोष मानले जाते. तसेच आताच्या क्षणाला यी तिन्ही आरोपींनाही मानले जायला हवे.

त्यांनाही इतर कोणाहीप्रमाणे  शिक्षण घेण्यासह सर्व मूलभूत हक्क उपभोगण्याचा हक्क आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यास त्यांना नकार दिला जाऊ शकत नाही. तरीही यामुळे तपासात काही व्यत्यय येऊ नये यासाठी न्यायालयाने हे शिक्षण घेत असताना काही बंधने घातली. मुंबई उच्च न्यायालयाने कठोर अटी घालून या तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. तसेच त्यांची डॉक्टरी व्यवसाय करण्याची सनदही खटल्याचा निकाल होईपर्यंत निलंबित करण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध तिघींनी केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

त्यातच हा पदव्युत्तर शिक्षणासाठीचा अर्ज केला गेला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मेहरे व खंडेलवाल या दोन आरोपींची डॉक्टरीची सनद निलंबित केली. परंतु मार्चमध्ये ती पुन्हा प्रभावी करण्यात आली. आरोपी आहुजाची सनद अन्य राज्यातील आहे. तिची नोंदणी महाराष्ट्र कौन्सिलकडे करण्याची प्रक्रिया सुरू  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER