
औरंगाबाद : रस्त्याचे काम निकृष्ट होते आहे, अशी तक्रार केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) आणि बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक येरेकर यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली, असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन अशोक निकम (Sachin Nigam) यांनी केला. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय ते विद्यापीठ द्वारपर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट होते आहे, अशी तक्रार मी बांधकाम विभागाकडे करून या रस्त्याचे काम थांबविण्याची मागणी केली आहे. यामुळे चिडलेले खासदार इम्तियाज जलील आणि बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अशोक येरेकर यांनी मला हातपाय तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली आहे.
सचिन निकम यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामाबाबत गेल्या वर्षभरापासून मी तक्रार करत आहे. त्यामुळे खासदारांच्या दबावात प्रशासन आमच्या विरुद्ध खोटे गुन्हे नोंदवू शकते,.
‘व्हीडिओ व्हायरल’
रस्त्याच्या कामाबाबत रिपाइं विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे खासदार जलील यांना जाब विचारत असतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी एक कार्यकर्ता खासदारांवर गंभीर आरोप करतांना दिसतो आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला