‘तुझेच हे चक्र फिरे जगावरी’…!

दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांची मांदियाळी

Dikhshabhumi

नागपूर :- शेकडो वर्षांपासून गुलामगिरीत असलेल्या गुलामांच्या बेड्या त्या महामानवाने तोडल्या. कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. या शोषितांना, पीडितांना समाजात ताठ मानेने जगण्याची शक्ती दिली. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांची मांदियाळी होती. स्तूपात पवित्र अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

दर्शन आणि अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर दाखल झाले. सायंकाळी गर्दी आणखीनच वाढली होती. दीक्षाभूमीवर स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर दुतर्फा पंचशील ध्वज लावले होते. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अनुयायांनी अभिवादन केले. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीच्या मार्गावर होते.

ambedkarसायंकाळी दीक्षाभूमीवर कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी अभिवादन करण्यासह काही काळ या प्रेरणाभूमीवर घालविला. दीक्षाभूमीच्या बाहेरील रस्त्यावर बुद्धमूर्ती, पुस्तकांची दुकाने सजली होती. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. संविधान चौकातही विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी हा परिसर निनादला होता.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील अनेक नागरिकांनी दीक्षाभूमीवर एकच गर्दी केली. नागरिकांनी अख्खा दिवस कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर घालविला. सोबतच जेवणाचे डबे आणले होते. दीक्षाभूमीच्या परिसरातील हिरवळीवर सतरंजी टाकून अनुयायी कुटुंबासह भोजन करताना दिसले. दिवसभर दीक्षाभूमीवर घालविल्यानंतर सायंकाळी अनुयायी घरी परतले.
विविध संस्था संघटनातर्फे महामानवास अभिवादन भारत२त्न प. पज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानितित्त विविध संस्था संघटनातर्फे अभिवादन करण्यात आले. नेते, पदाधिकाऱ्यांनी संविधान चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना दिली.

mahapri nirvan dinविदर्भ स्वराज्य आंदोलन समिती : विदर्भ स्वराज्य आंदोलन समितीच्या वतीने समितीचे संयोजक विदर्भवादी तृतियपंथी उत्तम बाबा सेनापती यांनी माल्यार्पण करून आदराजंली अर्पण केली. यावेळी डॉली पटेल, रानी अग्रवाल, बेबो सेनापती, सारीका, रोली, छारा, चंपा, ईश्र्वरीया, अक्षरा, प्रिती, रिना, साहिला, शानिया, विद्या, कांचन, रिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधू महाविद्यालय : पाचपावली येथील दादा रामचंद सिंधू महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य के.जे. चॅरियन यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. सतीश तेवानी, प्रा.आर.आर.शिंपी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि संचालन प्रा. संघमित्रा शिंपी यांनी तर आभार प्रा.ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मिलिंद अम्बादे, हर्षद भैसारे, प्रा.विजया कुमार, प्रणय वानखेड़े, नवीन अग्रवाल, राजू गेहानी, अमित नानवानी यांनी परिश्रम केले.

इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमेटी : इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमेटीच्या वतीने कमेटीचे अध्यक्ष दिनेश घरडे यांनी संविधान चौकातील माल्यार्पण करून भावपूर्ण आदराजंली अर्पण केली. यावेळी माजी नगरसेवक अंबादास गोंडाणे, सुरज आवळे, बॉबी दहिवले, महेश खोब्रागडे, सुनिल वासनिक, प्रतिकार डोगंरे, चंद्रकांत जांभुळकर, प्रकाश भिवगडे, ज्योती पाटिल, विद्या जनबंधू, राधिका मेश्राम, रेखा मडके, सत्यफुला घरडे, प्रभाबाई महाजन, तारा मेश्राम, रायवंता मेश्राम, बिंदीया साखरे आदी उपस्थित होते.