निर्बंध असतानाही शिवसेना आमदाराकडून छटपूजेच आयोजन, हजारोंची गर्दी

दिलीप लांडे - छटपूजन

मुंबई : प्रशासनाने नागरिकांना घरी छठपूजन करण्याचे आदेश दिले असले तरी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी त्यांच्या चांदिवली मतदारसंघात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कोविड -१९ (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर गर्दीवर आळा बसावा यासाठी नियम केले असतानाही प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणीही लक्ष न देता कुर्ला, पवई आणि संघर्ष नगर येथे हजारो भाविक जमले.

छटपूजेच्या एक दिवस आधी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने समुद्रकिनारे, तलाव आणि नदीकाठच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यास बंदी घातली होती. समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – 19’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. त्यामुळे सामूहिक छटपूजेची परवानगी देता येणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले होते. मात्र सेने आमदाराने याकडे दुर्लक्ष करतसामूहिक छटपूजेचे आयोजन केले होते.

कुर्ल्यातील शीतल तलावामध्ये शुक्रवारी पूजा करण्यासाठी किमान एक हजार लोक एकत्र आले, त्यातील अनेकांनी स्नान केले. इतर दोन कार्यक्रम पवई आणि संघर्ष नगरातील तुंगा येथे आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी सुमारे ७००-८०० लोक होते.

या मुद्यावरून भाजप (BJP) शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार उतरला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “महा विकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिवसेनासुद्धा सरकारच्या आदेशांचे पालन करत नाही, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.