World students day च्या निमित्ताने आयुर्वेदात वर्णित शिष्य विचार !

भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस युनायटेड नेशन व्दारा world student’s day म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिकण्याची संधी सोडू नये. आयुर्वेद शास्त्र शिकतांना शिष्याचे वर्तन, त्याचे कर्तव्य कसे असावे याबद्दल आयुर्वेदात देखील मार्गदर्शन केले आहे. शास्त्र पारंगत होण्याकरीता अध्ययन अध्यापन आणि विविध सेमिनार संमेलन वादविवाद यात भाग घेणे आवश्यक आहे असे चरकाचार्य म्हणतात. त्याकाळात सुद्धा चर्चा करणे वादविवाद करणे व त्यानंतर पक्का निर्णय घेणे याला महत्त्व होते. शिष्यांनी प्रश्न विचारणे व गुरुंनी त्याचे समाधान करणे या पद्धतीने शिकविल्या जायचे. शास्त्र मुखोद्गत असणे स्वाभाविक होते. आयुर्वेदात आचार्यांनी अध्ययन अध्यापन कसे असावे गुरु – शिष्य कसा असावा, याचे सुंदर विवेचन केले आहे.

Ayurveda-Student dayकल्यः (स्वस्थ) व कृतक्षण ( बाकी सर्व कार्य सोडून केवळ आयुर्वेद अध्ययन करण्याचा संकल्प ज्याने घेतला आहे.) विद्यार्थ्याने प्रातःकाळी उठून प्रातःविधी आटपून देवता ऋषि गौ गुरु वृद्ध आचार्य सर्वांना नमस्कार करून एकाग्र मनाने जे शिकले आहे त्याची वारंवार आवृत्ति करावी. दिवसाचा वेळ व्यर्थ न घालवता शास्त्राचा अभ्यास करावा ही अध्ययन विधी आहे. शिष्य अवस्थेत असतांना शिकणे, पारंगत होणे हा एकमेव ध्यास असावा हे शिष्य कर्तव्य आहे.

शिष्य कसा असावा – तो शांत, चांगले कार्य करणारा, धैर्यवान, अहंकाररहित, शिकविलेले समजून घेणारा, तर्क करणारा, स्मरण शक्ति संपन्न, उदार मनाचा, अध्ययनात प्रेम असणारा, स्वच्छ राहणारा, चतुर, शास्त्राचा अर्थ समजून प्रत्यक्ष कर्म (practical knowledge) करण्याकरीता उत्सुक, आळशी नसलेला, गुरु आज्ञा व उपदेश ऐकणारा, विश्वासपात्र, शीलवान, अध्ययन (शिकण्याकरीता) उत्सुक असावा.

आयुर्वेद शास्त्र वैद्यक शास्त्र असल्याने आयुर्वेदाचा शिष्य कसा असावा हे आचार्यांनी सांगितले आहे.

अध्ययन करतांना काही नियम सांगितले आहेत –

  • वीजाचा कडकडाट आग लागणे भूकम्प, मोठा उत्सव, चंद्र – सूर्य ग्रहण, अमावस्या, संध्यासमय अशा वातावरणात अध्ययन करू नये.
  • गुरुमुखातून न निघालेल्या विद्येचे अध्ययन करू नये. म्हणजेच गुरुकडूनच शिक्षण घ्यावे.
  • अनियमित, अतिशीघ्र अतिविलंब उच्चारण करू नये.
  • अति हळू अति जोरात पठण करू नये. इ.

आज World students day च्या निमित्ताने आयुर्वेदाचा हा वेगळा पैलू कळावा हे देखील गरजेचे आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER