राणा जगजितसिंह यांना पाडण्याची भाषा केली तर जशास तसे उत्तर देण्यात येईल : भाजपा

rana

उस्मानाबाद :- भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना पाडण्याची क्लेशदायक, अशोभनीय भाषा कुणी केल्यास भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिला. महायुतीचे खासदार ओमराजे यांनी काल याबाबत एक वक्तव्य केले होते.

तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार ओमराजे यांनी घेतली होती. त्यावर भाजपमध्ये खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, सतीश दंडनाईक, नगर पालिकेतील गटनेते युवराज नळे, अॅड.नितीन भोसले उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत जिवाचे रान केले. त्यांनी मोदीमुळेच निवडून आलो, अशी भावनाही निकालानंतर व्यक्त केली. सकाळ-संध्याकाळ मोदींचे नाव घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता, त्याच मुख्यमंत्र्यांच्या आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालेल्या राणा पाटील यांच्यावर टीका करता, हा युतीचा धर्म नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे. त्यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, क्लेशदायक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे कालपासून फोन येत आहेत.

भाजपला जिल्ह्यातील चारपैकी एकच जागा महायुतीकडून मिळाली. मात्र, चारही जागा कशा निवडून येतील, याचा खासदारांनी विचार करायला हवा. खासदारांच्या या भूमिकेनंतर अन्य मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. त्यांनी आमच्या भावना ऐकण्यासाठी यावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आम्ही भाजपचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.