संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही; राजू शेट्टींनी सदाभाऊंना सुनावले

Raju Shetti - Sadabhau Khot

ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो; त्यांच्याकडे हे दोन्हीही नाही. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशा कठोर शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. “राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो” असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपाची साथ सोडण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात पुन्हा धरण्याचे संकेत दिले होते, त्याला राजू शेट्टी यांनी झिडकारल्याचे दिसते आहे.

शेट्टी म्हणाले, “मी गेली ३५ वर्षे चळवळीत काम करतो आहे. स्वच्छ हाताच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसासोबत काम करण्याची मला सवय आहे. ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून लावल आहे त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ खोत यांना हाकलण्याचे मूळ कारणच हे होत की ते स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य या आमच्या निकषात बसत नव्हते.”

“शेतकऱ्यांबाबत पुतणा-मावशीच प्रेम अनेक जण दाखवतात. पण त्यात गांभीर्य किती आहे हे बघाव लागेल. म्हणून मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या खोतांबद्दल आम्हाला काहीही प्रेम वाटण्याच कारण नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या मार्गाने चाललो आहोत आणि चालत राहू. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल म्हणूनच कदाचित ते आमच्याबाबत प्रेम भावना व्यक्त करत आहेत. पण, त्यांच्या अशा मायावी बोलण्याला कोणी फसणार नाही.” असे शेट्टी म्हणालेत.

खोत यांना खरोखरच पश्चाताप होत असेल तर त्यांनी – जे गोरगरीब शेतकरी कडकनाथ घोटाळ्यात पैसे बुडाल्याने आज तडफडत आहेत, त्यांची दिवाळी वाईट झालेली आहे, त्यांचे पैसे आधी परत करावेत; मगच त्यांच्या मागणीवर जरा विचार करता येईल अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER