राष्ट्रवादीत पक्षशिस्त मोडणाऱ्यांची खैर नाही; बंडखोर नेत्याची पक्षातून हकालपट्टी

NCP - Sharad Pawar

मुंबई :विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अशी बंडखोरी   करणा-या भोयर यांना राष्ट्रवादीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर (Chandrashekhar Bhoyar)यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात  शेखर भोयर  अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्तभंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजले  आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीच्यावतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.

त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून १ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER