भाजपत येणारे सगळेच काही साधुसंत नाहीत : एकनाथ खडसे

Eknath khadse

जळगाव :- भाजपत येणारे सगळेच काही साधुसंत नाहीत. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे आहे. कुणी सत्तेच्या संरक्षणासाठी तर कुणी पदासाठी तर कुणी अन्य कारणांसाठी भाजपत येत आहेत. राजकारणात हे घडतच असते. पण भाजपत प्रवेश करण्याआधी प्रत्येकाची स्वच्छता केली जाते. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर असून येणा-या लोकांना पवित्र केले जात असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपत होत असलेल्या पक्ष प्रवेशावर बोलताना सांगितले. त्यांनी मेगाभरतीवरही टोलेबाजी केली. खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवले. त्यांनी यशवंतराव चव्हाणांची साथ सोडून वेगळा पक्ष तयार केला. त्यांनी इतर पक्षांमधल्या अनेकांना आपल्या पक्षात ओढून आणले. आता तीच परिस्थिती त्यांच्यावरच उलटलीय असे मतही त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.