इटली आणि इराणहून येणा-या प्रवाशांचीही भारतीय विमानतळावर चाचणी

नवी दिल्ली :- सध्या जगभरात झपाटयाने पसरत असलेला कोरोना व्हायरसचा (CONVID 19) प्रसार होऊ नये म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगली जात आहे. चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलँड, सिंगापूर, नेपाळ, इंडोनेशिया, व्हियतनाम व मलेशिया व्यतिरिक्त इटली आणि इराण येथून येणा-या विमानातील प्रवाशांची भारतातील विमानतळावर मोठ्या प्रमाणात जागतिक तपासणी करण्यात येत असल्याचे नागरी उड्डयन विभागाचे महाउपसंचालक सुनिल कुमार यांनी म्हटले आहे.

या सर्व देशांतील विमानातून भारतात येणा-या प्रवाशांची ते विमानातून निघताक्षणीच भारतीय विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार या प्रवाशांकडून एक स्वयंघोषित अर्ज भरून घेण्यात येत असल्याचे विभागाने म्हटले आहे. या देशांच्या विमानात प्रवाशांनी बसताच विमानातच त्यांना तशा सूचना देण्यात येत आहे. याप्रकरणी तपास केल्याची पावती घेण्याचे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले आहे.