त्या चार काश्मीरी तरूणांची एटीसएसकडून सुटका

 लातूर (प्रतिनिधी)  : लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि उदगीरमध्ये अनेक दिवसांपासून वास्तव्य करून असलेल्या चार काश्मीरी तरूणांना त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून एटीएसने दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. गेल्या दोन दिवसांत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या मोबाईल काल्स तपासून पाहण्यात आले. त्यानंतर एटीएसने त्यांची मुक्तता केली. त्यांना लातूर जिल्ह्यात राहण्यासही मुभा देण्यात आली होती परंतू सुटकेनंतर हे तरूण काश्मीरला परतले आहेत.

अहमदपूर आणि उदगीरमध्ये काही काश्मीरी तरूण फिरत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर एटीएसचे कर्मचारी साध्या वेषात या तरूणांच्या मागावर होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर चारही जणांना लातूर पोलिस आणि एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

गेले दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या चौघांच्याही मोबाईलचे वर्षभरापासूनचे तपशिल मागवून घेतले. त्यांनी कुणाला फोन केले, त्यांना कुणाचे फोन आले. परदेशात काही फोन झाले आहेत का अशा अनेक बाजूंनी तपास करण्यात आला. परंतू पोलिसांना यामधून काहीही संशयास्पद आढळले नाही.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण रमजान महिन्यानिमित्त चंदा गोळा करण्यासाठी आल्याचा दावा केला. यापूर्वीही आपण चंदा गोळा करण्यासाठी आल्याचे या तरूणांनी सांगितले. ते ज्या ठिकाणी वास्तव्य करून होते त्यांचीही चौकशी पोलिसांनी केली. त्यांच्याकडूनही हे तरूण चंदा गोळा करीत असल्याचे पुढे आले.

दोन दिवसांच्या तपासणीनंतर पोलिसांनी या तरूणांची मुक्तता केली. त्यांच्यावर कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याचबरोबर त्यांना लातूर जिल्ह्यात राहण्याचीही मुभा देण्यात आली. परंतू सुटकेनंतर या तरूणांनी काश्मीरला परतण्याची इच्छा व्यक्त केली. नांदेडमार्गे हे चारही तरूण रेल्वेद्वारे काश्मीरकडे रवाना झाले.

भाषा, रंग, कपड्यांमुळे आला संशय

काश्मीरी तरूणांची भाषा, स्थानिक लोकांपेक्षा वेगळा पेहराव, राहणीमान, दिसणे यामुळे काही नागरीकांना त्यांचा संशय आला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांनी नागरीकांकडून आलेल्या माहितीची पडताळणी केली. या तरूणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे त्यांची मुक्तता केली- राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक, लातूर