‘त्या’ पाच दुर्दैवी मुलांना अखेर मिळाला ‘दत्तक’ पालकांचा आसरा

पोलिसांनी पकडलेल्या अवैध ‘दत्तक रॅकेट’चे प्रकरण

children finally

मुंबई : निपुत्रिक दाम्पत्यांना बेकायदा दत्तक देण्यासाठी लहान मुलांची खरेदी-विक्री (Child Trafficing) करण्यार्‍या एका आंतरराज्य टोळीचे रॅकेट गेल्या वर्षी पकडताना पोलिसांनी ‘सुटका’ केलेल्या सहापैकी पाच मुलांना अखेर `दत्तक` पालकांचे प्रेम आणि त्यांच्या घराचा आसरा मिळणार आहे.

या टोळीकडून ज्या दाम्पत्यांनी ही मुले ’बेकायदा’ दत्तक घेण्यासाठी घेतली होती त्याच दाम्पत्यांनी या मुलांचा दत्तक पालक म्हणून सांभाळ करण्यास नगर दिवाणी न्यायालयाने (City Civil Court) मंगळवारी अनुमती दिली . टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी टोळीवाल्यांसोबतच या दाम्पत्यांनाही आरोपी करून त्यांनी टोळीकडून ‘दत्तक’ म्हणून‘ दत्तक’ म्हणून घेतलेली मुले त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांची रवानगी एका अधिकृत दत्तक केंद्रात (Adoption Center)   केली होती.
जन्मदात्या आई-बापांनी पैशासाठी विकलेली ही सर्व मुले १९ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलगे आहेत. त्यांना ज्यांनी टोळीकडून ‘दत्तक’ घेतले होते त्यापैकी दोन दाम्पत्ये ठाण्यातील व प्रत्येकी एक दाम्पत्य मुंबई व दिल्लीचे आहे. या चार दाम्पत्यांनी मुलांचा ताबा  (Custody) आपल्याकडे द्यावा यासाठी केलेले अर्ज न्यायालयाने मंजूर केले. दिल्लीच्या आणखी एका दाम्पत्याने केलेला असाच अर्ज गेल्या आठवड्यात मंजूर झाला होता.

या निकालाविरुद्ध अपील करण्याचा कालावधी संपल्यानंतर महापालिकांनी या मुलांना ती आता ज्यांच्याकडे राहात आहेत त्या पालकांच्या नावाने जन्मदाखले द्यावे. तसेच संबंधित पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील एका महिला पोलीस शिपायाने या दाम्पत्यांच्या घरी नियमितपणे जाऊन ती मुलांचा सांभाळ नीट करत आहेत की नाही हे पहावे, असाही आदेश दिला गेला.

या दाम्पत्यांनी पलिसांनी त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा रद्द करावा यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच या रॅकेटमधून ‘सुटका’ केलेल्या सहाव्या मुलावर त्याच्या जन्मदात्या आईने हक्क सांगितल्याने त्यांची रीतसर दत्तक प्रक्रियाही अपूर्ण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER