ज्यांना डॉ बाबासाहेबांचे विचार समजले नाहीत तेच संविधान बचाव रॅली काढत आहे : ओवेसी

Owaisi

औरंगाबाद :- ज्यांना डॉ बाबासाहेबांचे विचार समजलेच नाहीत तेच सत्ताधारी संविधान बचाव रॅली काढून केवळ देखावा करत असल्याचे सांगत एमआयएमचे प्रमुख अॅड असुदुद्दीन ओवेसी यांनी भाजपसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, देशाला राज्यघटना भाजप किंवा काँग्रेसने दिली नाही तर ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या काळात वंचित, बहुजनांवर सर्वात जास्त अन्याय झाला असल्याचे सांगून ओवेसी म्हणाले, मोदी सरकारमुळे मोदी सरकारमुळे वंचित, दलित आणि बहुजन पीडित आहेत. अन्याय संपविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहाण्याची गरज आहे. आता वंचित, बहुजन दलितांचे एकीचे बळ दिसेल.

ही बातमी पण वाचा : पाकिस्तान आणि रा. स्व. संघ हिंसाचार आणि द्वेष यांचाच प्रसार करतात

आगामी निवडणुकीत एमआयएम व भारिप बहुजन महासंघाने हातमिळवणीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांचे प्रमुख अॅड. असदुद्दीन ओेवेसी व अॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी औरंगाबादेतील जबिंदा लॉन्सवर होत आहे.

औरंगाबादेत या आघाडीचा सर्वाधिक फायदा अॅड. आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघालाच होईल, ‘एमआयएम’ची ताकद त्यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र एमआयएमने भारिप बहुजन महासंघाऐवजी मायावतींच्या बसपला सोबत घेतले असते तर कदाचित ही आघाडी अधिक प्रभावी ठरली असती, अशी चर्चा रिपब्लिकन जनतेत आहे.

भारिपने औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातही उमेदवार उतरवला होता, मात्र तिथे त्यांचा उमेदवार चर्चेतही येऊ शकला नाही. याउलट बसपाने औरंगाबादेतील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. पश्चिममध्ये बसपाचे उमेदवार संजय जगताप यांनी 22 हजार मते मिळवली होती, तर पूर्व व मध्य मतदारसंघात या पक्षाने 10 हजारांपर्यंत मते मिळवली होती. लोकसभा निवडणुकीतही बसपाने 57 हजारांवर मते घेतली होती. बसपाच्या या ताकदीचा आगामी निवडणुकांत एमआयएमला निश्चितच फायदा होऊ शकला असता.

दुसरीकडे, भारिपकडे हक्काच्या मतदारांचा अभाव आहे. सध्याच्या एमआयएम-भारिप आघाडीचा काँग्रेस व राष्ट्रवादीला किती फटका बसणार याचीच चर्चा आहे. कारण संभाव्य तिरंगी-चौरंगी लढतीत जे मतदार कदाचित काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले असते ते आता या आघाडीचा विचार करू शकतील.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. गफार कादरी हे केवळ साडेचार हजार मतांनी पराभूत झाले. त्या वेळी एमआयएमसोबत इतर पक्ष असते तर पश्चिम व पूर्व मतदारसंघही ताब्यात घेता आला असता, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद महापालिकेत 115 पैकी एमआयएमचे 24 नगरसेवक आहेत. 15 जागी लढणाऱ्या भारिप बहुजन महासंघाला एकही जागा मिळवता आलेली नाही.या उलट बसपाचे 7 संख्याबळ आहे.

शहरात मुस्लिम मतदारांची संख्या 35 टक्क्यांपर्यंत, तर दलित मतदारांची संख्या 15 टक्क्यांच्या पुढे आहे. तसेच 30 टक्के ओबीसीतील 10 टक्के मतदान जरी या आघाडीकडे वळले असते तर संपूर्ण शहराचे सत्ताकारण त्यांच्या ताब्यात जाऊ शकले असते.

केवळ भारिपला सोबत न घेता एमआयएमने सर्वच रिपब्लिकन गटा-तटांना सोबत घेतले असते तर कदाचित औरंगाबादेतील तिन्ही मतदारसंघांत त्यांना यश मिळवता आले असते, अशीही चर्चा आहे.