
मुंबई : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे .औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतो. यावर आता सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.
बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) स्वतःचे नाव बदलले . विजयऐवजी बाळासाहेब केले. औरंगजेबाचे नाव तुम्हाला प्रिय असेल; पण संभाजीनगरच्या जनतेला नाही. हिटलरचे चिन्ह जगात ठेवत नाही, मग या गाझीचे कशाला ठेवता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला .
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मोठी डोकेदुखी ठरली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला