यंदा रणजी स्पर्धेचे सामने होणार नाहीत

यंदा रणजी स्पर्धेचे (Ranji Cricket) सामने होणार नाहीत हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केले आहे. मंडळाचे सचिव जय शहा (Jai Shah) यांनी शुक्रवारी विविध संघटनांना लिहिलेल्या पत्रात हा निर्णय जाहीर केला आहे. राज्य संघटनांनी रणजी स्पर्धेसंदर्भात कळविलेल्या त्यांच्या मतावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे शहा यांनी म्हटले आहे. रणजी स्पर्धा १९३४-३५ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच या स्पर्धेच्या आयोजनात खंड पडणार आहे. यंदा रणजी सामने होणार नसले तरी पुरुष, महिला व १९ वर्षाआतील गटाचे ५० षटकांचे सामने होणार आहेत. या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना जय शहा यांनी म्हटले आहे की, यंदा भरपूर वेळ वाया गेला आहे आणि कोरोनामुळे पाळावी लागणारी खबरदारी व बंधनांमुळे सर्वच स्पर्धांचे नियोजन करणे अवघड आहे.

मात्र महिलांचे क्रिकेट ठप्प न पडू देणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून पुरुषांच्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसोबतच महिलांचीही वन डे सामन्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ वर्षांआतील मुलांसाठीच्या विनू मंकड ट्रॉफीचे सामने होणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच आपल्याला कळविण्यात येईल, असे जय शहा यांनी राज्य संघटनांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रविवारी अंतिम सामना होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या यशस्वी आयोजनाने आणि इंग्लंड संघाच्या दौऱ्याने आशेचा किरण दाखवला आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य संघटनांकडून सूचना मागविल्या होत्या. मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रणजी सामने आयोजनाच्या बाजूने होते आणि ही स्पर्धा यंदा वेगळ्या स्वरूपात घेतली जाईल, असा अंदाज होता; पण राज्य संघटनांकडून रणजी सामने आयोजनास अनुकूलता दिसून आली नाही. त्यामुळे ८६ वर्षांत पहिल्यांदाच यंदा रणजी स्पर्धेचे सामने होणार नाहीत हे आता निश्चित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER