यंदा परदेशी फलंदाजांना भारी पडताहेत भारतीय फलंदाज

IPL

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) नेहमीपेक्षा वेगळं चित्र दिसतय. एरवी परदेशी फलंदाज आयपीएल गाजवतात. यंदा मात्र भारतीय फलंदाज चमकत आहेत. आयपीएल 2020 मधील 30 सामन्यानंतरची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की सर्वाधिक धावा, लागलेली दोन्ही शतके, पहिल्या तीन सर्वोच्च खेळी यात भारतीय फलंदाजच आघाडीवर आहेत.

धावांच्या बाबतीत के.एल.राहुल (K.L.Rahul) व मयांक अगरवाल (Mayank Agarwal) हे आघाडीवर असून या दोघांनीच 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तिसऱ्या स्थानावरील फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) 298 धावा आहेत.

योगायोगाने आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत जी दोन शतके लागली आहेत ती ह्याच दोघांची आहेत. यानंतर मुंबई इंडीयन्सच्या इशान किशनची 99 धावांची खेळी आहे. याप्रकारे पहिल्या तीन मोठ्या खेळी भारतीय फलंदाजाच्याच आहेत. त्यानंतर जाॕनी बेयरस्टोची 97 धावांची खेळी येते.

80 धावांच्या वरच्या आतापर्यंत 12 खेळी झाल्या आहेत. त्यापैकी 9 खेळी म्हणजे 75 टक्के खेळी भारतीय फलंदाजांच्या आहेत. 2016 पासूनच्या आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांचा अशा खेळींमध्ये वाटा 50 टक्क्यांच्यावर प्रथमच पोहोचला आहे.

आणखी थोडे खाली आले आणि अर्धशतकी खेळींचा निकष लावला तरी भारतीय फलंदाजच आघाडीवर आहेत. यंदा आतापर्यंत लागलेल्या 61 अर्धशतकांमध्ये भारतीय फलंदाजांचीं 36 अर्धशतके आहेत आणि बाहेरच्या फलंदाजांची 25 आहेत.

सर्वाधिक अर्धशतकांबाबत मात्र परदेशी खेळाडूंनी बाजी मारली आहे. जाॕन बेयरस्टो, एबीडी विलियर्स व फाफ डू प्लेसिस यांची प्रत्येकी 3 अर्धशतकं आहेत.भारतीय फलंदाजांत के.एल.राहुल व देवदत्त पडीक्कल यांनी प्रत्येकी तीन अर्धशतकं लगावली आहेत.

बेन स्टोक्स, एबीडी विलियर्स, डेव्हिड मिलर, स्टिव्ह स्मिथ, निकोलस पूरन, जाॕनी बेयरस्टो, जोस बटलर, क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस, शेन वाॕटसन, ग्लेन मॕक्सवेल, किरेन पोलार्ड आणि केन विल्यमसन अशी मोठमोठी नावे असताना भारतीय फलंदाजांचे हे यश उल्लेखनीय आहे. त्यातही समाधानाची बाब ही की स्थिरस्थावर गड्यांपेक्षा श्रेयस अय्यर, मयांक अगरवाल, देवदत्त पडीक्कल, शुभमान गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॕमसन, राहूल तेवतीया, पृथ्वी शाॕ असे नव्या दमाचे व नव्या पिढीचे फलंदाज चमकत आहेत ही सुखावह बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER