बंगालच्या ‘गंगासागर मेळ्या’त भाविकांना यंदा फक्त ‘ई-स्नान’

kolkata HC

कोलकाता :- मकरसंक्रांतीनिमित्त प. बंगालमध्ये होणाऱ्या ‘गंगासागर मेळा’ या प्रमुख धार्मिक जत्रोत्सवात यंदा कोरोना महामारीचा धोका लक्षात घेऊन भाविकांना गंगा नदीत प्रत्यक्ष डुबकी मारून पवित्र स्नान करण्याऐवजी फक्त ‘ई-स्नान’ करू दिले जात आहे. एका जनहित याचिकेवर कोलकत्ता उच्च न्यायालयाने (Kolkata High Court) दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मेळ्याच्याच ठिकाणी प्रत्यक्ष गंगेच्या पात्रात न उतरताही गंगास्नान करता यावे यासाठी भाविकांना विनामूल्य गंगाजल काठावरच उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. कोणाला पवित्र स्नानासाठी गंगाजल घरपोच हवे असेल तर माफक शुल्क आकारून तीही सोय करण्यात आली आहे. लाखो लोकांनी गर्दी करून अल्पावधीमध्ये नदीपात्राच्या मर्यादित भागात एकदम स्नान केले तर कदाचित कोरोनाचा प्रसार होऊ शकेल ही शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने अशा प्रकारे ई-स्नानाची सूचना केली होती. वाहत्या पाण्यात स्नान केल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अजिबात नसण्याएवढी विरळा आहे, अशी भूमिका राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली. तरीही खबरदारी म्हणून लोकांना नदीपात्रात उतरू न देता स्नानासाठी गंगाजल काठावर व हवे असल्यास घरपोचही देण्याची व्यवस्था सरकारने केली.

मेळा अजिबात न भरविण्याची सूचना मात्र सरकारने अमान्य केली व गर्दीच्या नियंत्रणासाठी चोख व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. न्यायालयानेही त्याविषयी समाधान व्यक्त करत मेळा भरविण्यास पूर्ण मनाई केली नाही. एरवी या मेळ्याला  १२ ते १५ लाख भाविकांची गर्दी उसळत असते. यंदा ही संख्या जेमतेम अडीच-तीन लाखांच्या घरात आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER