या गायकाची ही इच्छा अपूर्णच राहिली

Mukesh

बॉलिवुडमध्ये प्रत्येक कलाकाराची एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. परंतु त्यात त्यांना यश येतेच असे नाही. बॉलिवुडमधील एका प्रख्यात गायकाचीही अशीच एक इच्छा होती जी शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही. खरे तर गायकाने आपल्या जीवनात इतके प्रचंड यश मिळवले होते की त्याची एखादी इच्छा अपूर्ण असेल असे वाटलेही नव्हते. ज्या गायकाची इच्छा अपूर्ण राहिली त्याचे नाव आहे मुकेश. आता तुम्हालाही आश्चर्य वाटेल की मुकेशची अशी कोणती इच्छा होती जी पूर्ण झाली नाही. मुकेशने आपल्या कारकिर्दीत सगळ्या संगीतकारांसाठी आणि नायकांसाठी गाणी गायली.

अगदी अनिल विश्वास, हुस्नलाल भगतराम, खेमचंद प्रकाशपासून, रोशन, बुलो सी रानी, मदन मोहन, जयदेव, सी. रामचंद्र, सरदार मलिक, चित्रगुप्त, एस. डी. बर्मन, नौशादपासून ते शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, ख्य्याम, रवि, उषा खन्ना, आर. डी. बर्मन, सलील चौधरी, बप्पी लाहिरी, राजेश रोशन आणि रवींद्र जैन या सर्व संगीतकारांचा समावेश आहे, तसेच अगदी राज कपूरपासून दिलीप कुमार, मनोज कुमार, राजेश खन्ना, शशि कपूर, जीतेंद्र, धर्मेंद्र आणि अमिताभपर्यंत सगळ्या कलाकारांना आपला आवाज दिला होता. अशा या मुकेशची जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती होती आत्मचरित्र लिहिण्याची.

मुकेशला रोज डायरी लिहायची सवय होती. ही सवय बॉलिवुडमध्ये संघर्ष सुरु केल्यापासून होती. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा घटनाक्रम डायरीत लिहिलेला असायचा. स्वतः मुकेशनेच आपल्या आत्मचरित्राबाबत त्याच्या एका मित्राला ही गोष्ट सांगितली होती. मी केलेला संघर्ष, मला मिळालेले यश, मला ज्यांनी मदत केली त्यांच्याबाबतच्या भावना मी डायरीत लिहून ठेवत असतो. मला माझ्या जीवनाची कथा पुढच्या पिढीपर्यंत न्यायची आहे. त्यामुळे मी माझे आत्मचरित्र लिहिणार आहे. आत्मचरित्र लिहिताना काही चुकू नये म्हणून या डायरीचा मला उपयोग होणार आहे. असेही मुकेशने त्याच्या मित्राला सांगितले होते. परंतु दुर्देवाने आत्मचरित्र लिहिण्यापूर्वीच मुकेशचे निधन झाले आणि त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER