लोकसभेसोबतच या तीन राज्यांत होऊ शकतात विधानसभा निवडणुका !

election

मुंबई : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे याबद्दलचे तर्कवितर्क लावले जात आहेत . एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी भाजप नेतृत्व महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकादेखील सोबत घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे राजकीय विशेषज्ञांची मते  आहेत.

तशी तयारी करण्याचे आदेश संबंधित राज्यांतील नेत्यांना देण्यात आल्याचीही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंड या  राज्यांतील पक्षनेतृत्वानुसार  राज्य सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करणेच योग्य राहील. मात्र पक्षातील एका गटाच्या म्हणण्यानुसार दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दोन्ही गटांची मते जाणून घेतल्याचे समजते. महाराष्ट्र आणि हरियाणा या विधानसभांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतो. तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ हा डिसेंबरमध्ये संपतो. तेव्हा या तीन राज्यांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या की कार्यकाळ पूर्ण होऊ द्यायचा याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर अवलंबून आहे.