अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे ‘ठाकरे’ सरकार पडेल – तृप्ती देसाई

trupti desai - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारने उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक स्तरावरुन सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. चंद्रपुरमधील दारुबंदी हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे ‘ठाकरे’ सरकार पडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात दिली.

चंद्रपुरातील दारूबंदी उठवली म्हणजे सरकारने पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिलांच्या आयुष्याची त्यांच्या संसाराची राखरांगोळी होण्यासाठी द्वारे खुली केली असेच म्हणावे लागेल. सध्या राज्यात कोरोना महामारीची लाट आहे. त्यात लॉकडाऊन सुरू आहे. दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच दारूबंदी उठवावी असा क्रूर निर्णय कोणीही घेऊ शकत नाही. परंतु महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकारने हा निर्णय घेतला हे सत्य स्वीकारलेच पाहिजे. दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळले आणि म्हणूनच जनआंदोलनातून चंद्रपुरात दारूबंदीचे आंदोलन सुरू झाले आणि ते यशस्वीही झाले. सरकारचा हा दारूबंदीचा निर्णय म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धि’ असाच आहे. कदाचित या निर्णयामुळे अनेक महिलांचा या सरकारला शिव्याशाप लागून सरकार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी संतप्त भावना देसाई यांनी व्यक्त केली.

चंद्रपुरात जशी दारूबंदी झाली तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवा आणि ‘दारूमुक्त महाराष्ट्र करा’ अशी आम्ही मागणीही केली होती. अनेक आंदोलनही केली आहेत. सरकारच्या अनेक चांगल्या निर्णयांचे स्वागत ही आम्ही वेळोवेळी केले आहे. परंतु दारू पिणाऱ्यांचे समर्थन करणारे आणि दारू विक्रेत्यांना कोणताही तोटा होऊ नये यासाठी पुढाकार घेणारे हे महाविकास आघाडी सरकार आहे, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button