आयपीएल 2020 मध्ये हे विक्रम घडले प्रथमच

IPL
  • तीन सामने १० गड्यांनी विजयी
  • चार सामने झाले टाय
  • एकाच दिवशी दोन टाय सामने
  • अनकॕप्ड प्लेअरच्या ५०० वर धावा
  • चौघांचे २० वर षटकार
  • तीन गोलंदाजांच्या २५ पेक्षा अधिक विकेट्स

क्रीडा जगतातील प्रत्येक स्पर्धा आपली छाप सोडत असते. प्रत्येक स्पर्धेत काही ना काही नवीन होत असते. आयपीएल २०२०२  सुद्धा याला अपवाद नाही.

यंदाची आयपीएल ही  पहिली अशी स्पर्धा ठरली की, यात सर्वाधिक तीन सामने संघांनी एकही गडी न गमावता म्हणजे १० विकेट्सने जिंकले तर सर्वाधिक चार सामने टाय झाले. यापैकी दोन सामने तर आयपीएलच्या इतिहासात एकाच दिवशी टाय झाले. किंग्ज इलेव्हन आणि मुंबई दरम्यान तर सुपर ओव्हरही टाय झाले.

१० गड्यांनी जे सामने निकाली झाले त्यात एक आश्चर्यकारक वर्तुळ पूर्ण झालेले दिसले. ते असे की पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हनवर एकही गडी न गमावता विजय मिळवला; पण असा दणदणीत विजय मिळवणाऱ्या चेन्नईला पुढे मुंबईने ह्याच फरकाने मात दिली तर मुंबई इंडियन्सलासुद्धा  पुढे सनरायजर्स हैदराबादने १० गडी राखून मात दिली. या प्रकारे ज्या संघाने १० गडी राखून विजय मिळवला तो योगायोगाने पुढे जाऊन त्याच फरकाने हरलासुद्धा. या प्रकारे यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन असे संघ ठरले त्यांनी १० गडी राखून सामना जिंकलासुद्धा आणि गमावलासुद्धा. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले.

टाय सामने आणि १० गड्यांनी विजयांचे विक्रम आयपीएल २०२० मध्ये झाले; पण यंदाच्या स्पर्धेत एकही हॅट्रिक  झाली नाही हे आणखी एक वैशिष्ट्य. २०१५ व २०१८ नंतर आयपीएलचा हा पहिलाच असा मोसम ठरला ज्यात एकही हॅट्रिक झाली नाही.

मुंबईच्या ईशान किशननेही आजवर घडली नव्हती अशी कामगिरी यंदाच्या आयपीएलमध्ये केली. त्याने ५१६ धावा केल्या आणि एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय सूर्यकुमार यादवने ४८० धावा केल्या आणि आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका संघातील आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या दोन खेळाडूंनी ४०० वर धावा केल्या. एवढंच नाही तर मुंबईच्या ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या व डी काॕक या चौघांनीही २० वर षटकार लगावले आणि पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एका संघाच्या चार खेळाडूंनी २० वर षटकार लगावले.

गोलंदाजीतही आयपीएल २०२० हे पहिले असे आयपीएल ठरले ज्यात तीन गोलंदाजांनी २५ पेक्षा अधिक विकेट काढल्या. पर्पल कॅप  विजेत्या कसिगो रबाडाच्या ३०, जसप्रीत बुमराच्या २७ आणि ट्रेंट बोल्टच्या २५ विकेट राहिल्या. या प्रकारे आयपीएल २०२० मध्ये नवीन विक्रम घडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER