पावसापूर्वी कोरोनावर करू या पूर्वकाळजीचा हल्ला

Rain

Shailendra Paranjapeमहाराष्ट्रामध्ये कोरोनासंदर्भातली स्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. त्यामुळे पुण्यातही आता पुढचे दोन आठवडे लॉकडाऊन राहणार आहे. पण हा लॉकडाऊन रेड झोन वा कोरोनासंसर्ग जास्ती असलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक कडक केला जाणार आहे.

पुण्यामध्ये  कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यानं कोरोनाग्रस्तता तुलनेनं जास्ती असलेल्या पूर्व भागातल्या पेठा, मार्केट यार्ड, कोंढवा यासह जिल्ह्यातलाही कोरोनाग्रस्त भाग आदी ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कडक करतानाच संपूर्ण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात मात्र शिथिलता दिली जात आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योगाचं चक्र पुन्हा सुरू व्हायला हवं, हे खरंच; पण एकीकडं परराज्यातले हजारो मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये परत जात असताना चाकण, भोसरी, रांजणगाव, दौंड अशा औद्योगिक क्षेत्रांमध्ये  कारखाने पुन्हा सुरू होताना मजूर कोठून येणार हाही कळीचा प्रश्न आहे.

औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ तर हेही सांगताहेत की, चाकणसारख्या क्षेत्रात आणि शारीरिक श्रम तुलनेनं जास्ती कराव्या लागणाऱ्या अनेक कारखान्यांमध्ये मराठी माणसापेक्षा उत्तर भारतीय, बिहारी, ओरिसा, बंगालचे मजूर संख्येनं खूपच जास्ती आहेत. त्यामुळे परराज्यातले मजूर रांगा लावून त्यांच्या राज्यात परत जात असताना उद्योग क्षेत्राला मजूर उपलब्धता हा प्रश्नही येऊ शकतो. दुसरीकडे मे महिन्याची अखेर असल्यानं आणि सध्या या आठवड्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह पुण्यातही पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला असल्यानं चौथ्या लॉकडाऊनमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः रोड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून कोरोनाचा फैलाव ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन म्हणजे तुलनेनं कोरोनादृष्ट्या काहीशा सुरक्षित भागांमध्ये होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे.

राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना करण्यात आलेलं पाचारण, हे त्या दृष्टीनं चांगलं पाऊल आहे; पण त्या तैनात करताना कोरोना भयग्रस्त भाग आणि कोरोना सुरक्षित भाग या दोहोंमध्ये मानवी संपर्क येणार ही, याची पूर्णपणे काळजी घेतली जायला हवी आणि शहराचा संपूर्ण पूर्व भाग विलग करायला हवा. ती कारवाई मागच्या आठवड्यात सुरूही झालीय. पण कालच सदाशिव पेठेसारख्या भागात एकदम ३३ रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली होती हेही विसरून चालणार नाही. अर्थात, एकाच घाऊक औषध दुकानदाराकडचे लोक या रुग्णांमध्ये असल्यानं त्यांच्या संपर्कात आलेले शोधून काढणे तितकेसे अवघड नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाब आहे.

त्यामुळे आता खरी परीक्षा आहे ती कोरोनाचा फैलाव नियंत्रित करण्याची आणि कोरोना संशयितांचा आकडा हा रोजच्या रोज बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी होत राहण्याची. त्या परीक्षेत केवळ प्रशासन, वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा व मनुष्यबळच नव्हे तर सर्वच नागरिकांचा सहभाग असण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शहराच्या मध्य भागात कोरोना घुसू न देणे, पूर्व भागातला कोरोना हळूहळू नियंत्रित करणे आणि दैनंदिन जीवन सुरू करतानाच मान्सूनच्या सरी बरसू लागतील तोवर नव्यानं कोरोनाला हरवण्याची जिद्द आणि मानसिक तयारी संपूर्ण समाजात निर्माण करणं, हे आव्हान पण सर्वांसमोर आहे.

शैलेन्द्र परांजपे