हा टेनिसपटू म्हणतो, ‘ मी फक्त पैसे कमावण्यासाठीच टेनिस खेळतो’

Alexander Bublik

खरं तर मला टेनिस अजिब्बात आवडत नाही. मी टेनिसचा तिरस्कारच करतो पण फक्त पैसे कमावण्यासाठी मी हा खेळ खेळतोय, असे धक्कादायक विधान कझाकस्तानचा टेनिसपटू अलेक्झांडर बुलबलिक याने केले आहे. एका फ्रेंच वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केले आहे. मार्सेली येथील टेनिस स्पर्धेत डेनिस शापोव्हालोव्हला नमवल्यावर त्याने हे रोखठोक मत व्यक्त केले.

तो म्हणतो, प्रामाणिकपणे सांगायचे तर टेनिसपटू असण्यात मला काहीच चांगली गोष्ट दिसत नाही. मी फक्त पैशांसाठी टेनिस खेळतोय. पैसा नसेल तरमी अगदी या क्षणाला हा खेळायचे थांबवेल. मी अजून पुरेसे पैसे कमावलेले नाहीत अन्यथा मी आधीच निवृत्ती घेतली असती. तुम्हाला दुखो-खुपो, काहीही होवो, दररोज नवनवीन प्रतिस्पर्ध्यांविरुध्द खेळत राहणे हे व्यावसायिक टेनिस जिवघेणे आहे. तुमचा घटस्फोट होवू देत, तुमची मैत्रीण तुम्हाला सोडून जाऊ दे, तुम्हाला खेळावेच लागते आणि तरी हरलात तर लोक विचारतात, तू कसा काय हरलास? टेनिसचा हा प्रकारच मला आवडत नाही.

बुबलीक हा व्यावसायिक टेनिसच्या जागतिक क्रमवारीत सध्या 55व्या स्थानी आहे आणि तो सर्वोच्च 48 व्या स्थानापर्यंत पोहचला होता. त्याने आतापर्यंत व्यावसायिक टेनिसपटू म्हणून 13 लाख डॉलरची कमाई केली आहे.