जगाला हेवा वाटेल असे डॉ. बाबासाहेबांचे स्मारक महाविकास आघाडी उभारणार- सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई :- हे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय असून जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार उभारेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाला भेट दिली. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे आणि आमदार सुनील शेळके यांनीदेखील सुप्रिया सुळे यांच्यासोबत स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीबाबत तसेच स्मारकाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधांबाबत अभियंत्यांकडून माहिती घेतली. या स्मारकाला दररोज पाच हजार लोक भेट देतील, असा अंदाज अभियंत्यांनी व्यक्त केला असता त्या तुलनेत येणाऱ्या लोकांना पार्किंग, स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली.

कोरोना (Corona) काळात राज्यातील सर्वच कामांना थोडी खीळ बसली होती. मात्र आता काम वेगाने सुरू असून एप्रिल २०२३ पर्यंत स्मारकाचे कामकाज पूर्ण होईल, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, अल्पसंख्याक सेलचे मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते.

६ डिसेंबरला चैत्यभूमीला न येता पोस्ट कार्ड पाठवण्याचे आवाहन

स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चैत्यभूमी येथे भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी चैत्यभूमी किंवा शिवाजी पार्कला गर्दी न करता त्याऐवजी पोस्ट कार्डवर आपला संदेश लिहून चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी स्वतः सुप्रियाताईंनी पोस्ट कार्डवर  संदेश लिहून चैत्यभूमीचे समन्वयक नागसेन कांबळे यांच्याकडे दिला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे आणि आमदार सुनील शेळके यांनीदेखील पोस्ट कार्डवर संदेश लिहून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER