पुष्करने कॉलेजमध्ये केला हा प्रताप

Pushkar Shrotri

मराठी सिनेमा, मालिका इंडस्ट्रीमध्ये अष्टपैलू अष्टपैलू कलाकारांची काही कमी नाही. दिसायला जरी ते आपल्याला पडद्यावर अभिनय करताना दिसत असले तरी पडद्यामागे त्यांच्या हातात अनेक कला सुखा-समाधानाने नांदत असतात. आपली कल्लाकारी दाखवणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) याचं नाव आवर्जून घेतले पाहिजे . जे मनात येईल ते शिकायचं हा त्याचा वेडेपणा त्याच्या लेकीला म्हणजेच शनायालादेखील चांगलाच माहीत आहे. ती गमतीने , माझा बाबा ठार वेडा आहे असं जेव्हा म्हणते तेव्हा पुष्करला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वेडेपणाबद्दलची आठवण पुष्करने सांगितली तेव्हा ते ऐकल्यानंतर त्याचे चाहते पोट धरून हसले.

पुष्कर मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमध्ये असताना खूपच वात्रट होता. म्हणजे कॉलेजमध्ये कुठलीही स्पर्धा असो , उपक्रम असो त्यात भाग घ्यायचा हे त्याचं तत्त्व होतं. मग त्या स्पर्धेत त्याचा नंबर येवो किंवा न येवो. याशिवाय कॉलेजमध्ये काही ना काहीतरी उचापती करणारा विद्यार्थी अशीदेखील पुष्करची ओळख होती. त्या काळामध्ये फॅन्सी ड्रेस किंवा एखाद्या सणाच्यानिमित्ताने ट्रॅडीशनल डे असा सोहळा असायचा आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रांतातले पेहराव करून कॉलेजला यायचे. आता हे फॅड कमी झालं असलं तरी पुष्करच्या कॉलेजकाळात असे डेज म्हणजे धमाल करण्यासाठी निमित्त असायचं. पुष्करसारखा मिश्किल आणि जगण्याचा भरभरून आनंद घेणारा विद्यार्थी ही संधी कशी सोडेल बरं ! खास फॅन्सी ड्रेसला सरदारजी बनून जाता यावं म्हणून त्या आधी काही दिवस पुष्करने केस आणि दाढी वाढवली होती. त्यानंतर तो पंजाबी पगडी घालून सरदारजी बनून कॉलेजला गेला होता. त्यानंतर फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात त्याने त्याच वाढलेल्या केसांची मागच्या बाजूने शेंडी बांधली आणि पुढच्या केसांचे टक्कल केलं. तो साउथ इंडियन अण्णा बनून कॉलेज कॅम्पसमध्ये पोहोचला.

पुष्कर सांगतो, कॉलेजमध्ये असताना पुढे काही दिवसांची सुट्टी लागणार होती. आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कॉलेजच्या संस्थापकांचा पुतळा होता. ते प्रत्यक्ष आयुष्यामध्ये टोपी वापरत असल्याने पुतळ्यावरही टोपी होती. सुट्टी लागण्यापूर्वी मी कॉलेजमध्ये आलो आणि त्या टोपीमध्ये माती भरली, धणे पेरले , त्यात पाणी टाकलं आणि मी निघून गेलो. सुट्टीनंतर कॉलेज सुरू झालं तेव्हा सगळे प्राध्यापक, आम्ही विद्यार्थी कॉलेजमध्ये आलो. गेटमधून आत आल्यानंतर समोरच तो पुतळा होता. त्या आमच्या संस्थापकांच्या पुतळ्याच्या टोपीतून कोथिंबीर उगवली होती. ते बघून आम्ही पोरं तर खूप हसत होतोच पण प्राध्यापकांनाही हसू आवरेना. कॉलेजमधली माझी ओळख पाहता सगळ्यांच्या एव्हाना हे लक्षात आलं होतं की हा कारभार मीच केला असणार. आमच्या संस्थापकांच्या टोपीतून उगवलेला तो कोथिंबिरीचा तुरा एखाद्या कुंडीतल्या रोपासारखा डोलत होता. अर्थात त्यानंतर माझे उपद्व्याप प्राध्यापकांपर्यंत पोहोचले. त्यांनी माझी कानउघाडणी केल्यानंतर मी ती कोथिंबीर शेती नष्ट करून टाकली हा भाग वेगळा. पण अजूनही मला तो किस्सा आठवतो आणि खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या खोड्यांमधून माझ्यातला वेडा कलाकार अजूनही मी जिवंत ठेवला आहे.

रंगभूमीवरील नाटकांमधून पुष्करने अभिनयात पदार्पण केलं असलं तरी अभिनयाव्यतिरिक्त पुष्कर उत्तम निवेदक, लेखक, वाद्यवृंद वादक, गायकदेखील आहे. जिथे कमी तिथे आम्ही या पंक्तीत बसणारे जे लोक असतात त्यामध्ये पुष्करची वर्णी लागते ती त्याला येणाऱ्या या सगळ्या वेगवेगळ्या कला कौशल्यामुळे. मंकी बात, येरे येरे पैसा, पेइंग घोस्ट हे त्याचे गाजलेले सिनेमे असले तरी आजपर्यंत त्याने हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये सिनेमे आणि मालिका केल्या आहेत शिवाय हसवाफसवी या नाटकात पुष्करने केलेल्या वेगवेगळ्या भूमिका हा त्याच्या अभिनय कारकिर्दीतला मैलाचा दगड म्हणावा लागेल. उबुंटू हा सिनेमा त्याने दिग्दर्शित करत या क्षेत्रातही पाऊल टाकलं. सध्या सून सासू-सून या शोचा निवेदक म्हणून पुष्कर श्रोत्री त्याच्या चाहत्यांसमोर छोट्या पडद्यावर आला आहे. या शोच्या माध्यमातून तो घराघरातील सासू-सून यांच्यातील नात्याची उकल करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER