हे ठाकरे सरकारचे पाप, अधिकाऱ्यांच्या बदलीने काहीही होणार नाही; भाजपची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav Thackeray - Sudhir Mungantiwar - Pravin Darekar - Maharastra Today

मुंबई :- सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली. परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र या सर्व घडामोडीवर भाजपच्या (BJP) नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर सिंह (Paramvir Singh) पदावरून हटविण्यात आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून काहीही साध्य होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पोलिसांचं राजकीयीकरण होणार नसेल, राजकीय नेते आपला सूड घेण्यासाठी पोलिसांचा वापर करणार नसतील तर ही यंत्रणा योग्य पद्धतीने काम करेल. राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. राजकीय नेत्यांचं मार्गदर्शन असावं, पण पोलिसांमार्फत स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नसावी. यामुळेच पोलीस अधिकारी योग्य दिशेने काम करू शकतात. जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करता, अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करू शकेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले की, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं स्वाभाविक आहे. या प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी सहभागी होता. त्याला नियंत्रित करणारे अधिकारी पोलीस आयुक्त होते. त्यामुळे उद्या या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तर मुंबई पोलिसांना हा मोठा धक्का असता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्वाभाविक आहे. तसंच पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं लक्ष्य नाही. तर मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण तडीस लागावं हा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही हे प्रकरण लावून धरलं. याची वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, हे आमचं ध्येय असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझे प्रकरण ;  आता ‘ती’ फाईल अमित शहांकडे, ठाकरे सरकारला आणखी एक धक्का? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER