… हा असंवेदनशीलतेचा कळस – देवेंद्र फडणवीस

- महिलांच्या सुरक्षेबाबत उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप

Devendra fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिला सुरक्षेबाबत राज्य सरकारचे दुर्लक्ष होते आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे ‘एसओपी’ तातडीने तयार करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली. राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वीसुद्धा पत्रव्यवहार केला आहे आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती; पण त्याबाबत अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.  त्यामुळे हे पुन्हा पत्र पाठवत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार याबाबत कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. अन्य विषयांवर हिरिरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करतानासुद्धा दिसत नाहीत! हा असंवेदनशीलतेचा  कळस आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यात महिला- तरुणींना जाळून मारण्याच्या किमान सात घटना घडल्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरा रोड, लातूर, नागपूर, लासलगावांत या घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा माध्यमांमध्ये घडविली गेली आणि कालांतराने तो प्रस्ताव थंडबस्त्यात टाकला गेला.

पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार (१७ जुलै), सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग (२० जुलै), पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉयकडून विनयभंग, क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग (२० जुलै), इचलकरंजी क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग (१५ मे), नंदूरबारमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा येथे शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा ‘स्वॅब’ घेणे अशा अनेक घटना यापूर्वीच्या पत्रात नमूद केल्या होत्या, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात करून दिली आहे.

नित्य घडणाऱ्या या घटना पाहता तातडीने कोविड सेंटर्ससंदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला अत्याचाराच्या घटना होणार नाहीत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असले पाहिजे. आपण या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्याल; आवश्यक उपाययोजना कराल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER