स्टिव्ह स्मिथवर अशी नामुष्की आली पहिल्यांदाच…

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) हा मोठमोठ्या खेळींसाठी प्रसिध्द आहे. क्वचितच छोट्या धावसंख्येवर बाद होउन आणि सातत्याने मोठ्या खेळी करुन त्याने हा नावलौकिक कमावला आहे पण भारताची अष्टपैलु फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो हे दाखवून देत स्टिव्ह स्मिथला आज मेलबोर्न (Melbourne) कसोटीत शून्यावरच बाद केले. अॕडिलेड कसोटीतही अश्विनने स्मिथला फक्त एका धावेवर बाद केले होते. याप्रकारे अश्विन हा आतापर्यंत तरी स्मिथला भारी पडला आहे.

भारताविरुध्द आतापर्यंत स्टिव्ह स्मिथ कसोटीत एकदाही शुन्यावर बाद झालेला नव्हता. भारताविरुध्द त्याने आतापर्यंत 46 डावात 2660 धावा केलेल्या आहैत आणि त्यात तो एकदासुध्दा शून्यावर बाद झालेला नव्हता पण आज अश्विनने त्याच्यावर ही नामुष्की आणली.

एवढेच नाही तर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही तो पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला आहे.

स्मिथच्या आधी अश्विनने मॕथ्थ्यु वेडला 30 धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर त्याने स्मिथला स्थिरावण्यास वेळच दिला नाही.आठव्या चेंडूवरच स्मिथ परतला. अश्विनने खोलवर टाकलेला एक चेंडू स्मिथच्या पॕडजवळ टप्पा घेतल्यावर बाहेर वळला आणि त्याच्या बॕटीची कड घेऊन चेंडू लैगस्लीपच्या जागी उभ्या कर्णधार रहाणेच्या हातात स्थिरावला.

माजी कसोटीपटू पार्थिव पटेलही प्रभावीत होऊन म्हणाला की ज्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर खेळून रहाणे समोर आलाय, मेलबोर्नची खेळपट्टी साधारण तशीच आहे. मुंबईकर नेहमीच खेळपट्टीतील ओलाव्याचा फायदा घेण्यासाठी फिरकी गोलंदाज लवकर लावतात. रहाणेला तोच अनुभव कामी आला. अश्विनला दोन षटकानंतर तो बदलू शकला असता पण त्याने वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी अश्विनचा चांगला उपयोग करुन घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER