गणेश नाईक अजित पवारांच्या भेटीला; केली ही मागणी

Ganesh Naik-Ajit Pawar

मुंबई : पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले आमदार गणेश नाईक(Ganesh Naik) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. नवी मुंबई शहरातील काही भूखंड अद्यापही नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेले नाहीत.  ते मिळावेत म्हणून भेट घेतल्याची माहिती नाईक यांनी दिली. या भेटीबाबत माहिती देताना नाईक म्हणाले की, नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अद्यापही महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आलेले नाहीत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली.

लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला देण्यात यावे, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांच्या गरजेचा विषय महत्त्वाचा आहे. सध्या कुटुंब वाढल्यामुळे अनेकांना घरांचा विस्तार करावा लागला आहे. त्यामुळे हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे आहे, ही मागणी अजित पवारांकडे केली. दरम्यान, गणेश नाईक भाजप सोडणार असल्याची चर्चा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झाली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असा दावा केला होता. त्यानंतर भाजपतील अनेक नेते राष्ट्रवादीत येण्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये आमदार गणेश नाईक यांचेही नाव पुढे होते. त्यावेळी या चर्चेविषयी बोलताना नाईक यांनी पक्षबदलाचे सर्व आरोप फेटाळून लावत या सर्व बातम्या अफवा असल्याचे म्हटले होते. पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरवून विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचं त्यावेळी नाईक यांनी स्पष्ट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER