असे हे जनतेचे समुपदेशक !

Public counselor

सायंकाळच्या सुमाराला थाळी वाजवून गाडगे बाबांचे किर्तन असल्याचा डांगोरा कुणीतरी शिष्य करत असे. कीर्तनाची जागा गाडीतळ, चावडी पुढील मैदान किंवा देवळापुढील मैदान असे. बसायला ना बैठक! ना तबला पेटी ! टाळ पखवाज यांच्या खणखणीत आवाजात मंडळी जोरात भजन करीत असत,” गोपाळा गोपाळा, देवकीनंदन गोपाळा!” चाल अगदी साधी पण प्रभाव मात्र अतिशय जास्त असे. श्रीकृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐकताच गोपाळ, गवळणी, गाई वासरे जशी त्यांच्या दिशेने धावत, त्याच प्रमाणे या नामस्मरणाचा आवाज ऐकताच लोकांची त्या दिशेने रीघ लागे. तरुण मंडळी जमिनीवर बसत आणि दंग होऊन देहभान विसरत. मधेच भजन थांबवून बाबा लोकांना प्रश्न विचारीत. त्या

प्रश्नांची उत्तरं त्यांच्या भोवताली बसलेला शिष्यगण एकासुरात देई.
बाबा :” या जगात सर्वात मोठा कोण आहे?” ” देव मोठा आहे का? ”
भक्त : “नाही संत मोठा, संतच मोठा !”
बाबा :” संत कोणाला म्हणावे ? बाबांनो !संत कोणाला म्हणावं ?”
भक्त :” जो जगाचे आघात सोसतो ,गरिबांची सेवा करतो, असा दयाळू माणूस तोच !”

फ्रेंड्स ! हे वर्णन आहे कीर्तनकार संत समाज सुधारक अशा गाडगे महाराजांच ! हे बघतांना मला जाणवलं की आपल्याकडे समुपदेशकांची अशी एक परंपरा आहे. रामदास स्वामी आणि राजा शिवछत्रपती, किंवा कल्याण स्वामी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद , तसेच गुरु शिष्य परंपरा किंवा आपले सगळे संत महंत हे सर्वसामान्यांना एक मार्ग दाखवत. समुपदेशकाचे ही काम हे अडचणीत आलेल्यांना प्रश्न सोडवण्यास मदत करणं हेच असतं. आणि आणखीन एक म्हणजे समुपदेशक कधीही प्रश्नाचे रेडिमेड उत्तर देत नाही तर ते उत्तर सल्लार्थीलाच शोधून काढावं लागतं, सल्ला तिकडूनच ते काढून घेणं हेच तो करत असतो. केवळ बरोबर असणं, आणि थोडं मार्गदर्शन हेच समुपदेशक करतो.

हीच प्रचिती मला संत गाडगेबाबांच्या किर्तनाच्या स्वरूपामध्ये आढळली. बाबांचे कीर्तन प्रश्नोत्तर स्वरुपात कसे गप्पा मारल्यासारखे असायचे. कुठे एखाद्या खेडेगावात जायचे, विचारायचे, “या घाणीत कसे राहता बा तुम्ही? ” लोक म्हणत , “तसेच !”

“कॉलरा पिलग होते का नाही ? ” “हा होतो !”
“लोकं मरतात का नाही ? ” “हा, मरतात !”
“मग तुम्ही काय करता ? ” “देवाला नवस करतो ही इडा पिडा टळू दे ,तुला बकरा खायला घालीन” असे म्हणतो.” बा बाप्पा ! देवाला नवस करून कधीही रोग पळतो काय ? तुमच्या गावात विहीर आहे का ?”
“हा !आहे.” ” तिच्यात धुणं धूता का नाही ? भांडी विसळता का नाही ? अंघोळी करता का नाही ?”
“हा ! समद करतो ” . “पाणी प्यायला कुठलं जी ? ” “त्येच अन् काय .”
“मग देवाला शंभर नवस बोलले तरी रोग पळणार नाही ! “.बाबा म्हणत.

असे हे गाडगे बाबांचे किर्तन ! लोकांकडूनच आपल्याला पाहिजे ते काढून घ्यायचे. लोकांच्या मनावर ठसवण्याचा हा मार्ग कुठल्याही समुपदेशन कौशल्य न शिकलेल्या गाडगेबाबांचा होता. त्यांचे कीर्तन रंगत असे कारण ते सामान्य जनतेच्या भाषेत बोलत .त्यांच्या उपयोगाच्या गोष्टींबद्दल बोलत आणि या सर्वांबद्दल ते कोणाकडे काही बिदागी मागत नसत. त्यामुळे बहुजन समाजावर त्यांचे विलक्षण वजन होते. अशा कीर्तनामध्ये ते काही चांगल्या गोष्टी सांगत, मोठ्या आवेशाने ते म्हणत की, “बर दिवाळीच्या दिवशी गोड मुळीच खाऊ नका ,चोरी करू नका ,दारू पिऊ नका आणि आपल्या पोरांना शाळेत घालून शिकवल्या खेरीज राहू नका. याशिवाय प्राणीमात्रांवर च्या प्रेमामुळे देवाला प्राणी बळी देऊ नका!” असं ते विनवत असत. जिथे बकरी कापली जात तिथे उभे राहून बाबा म्हणत,” माझ्या मानेवर आधी सुरी चालवा. या बकऱ्यापेक्षा मी मोठा बकरा आहे ना…..”गाईंना कसायाच्या हातून सोडवून गोरक्षण संस्थेत पाठवून देत आणि गाईंना चारा मिळावा म्हणून देणग्या मिळवत. मंत्रतंत्र, जादूटोणा, चेटूक यांचीही टर उडवत. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्रे चालविली, स्वतः मात्र त्यातून कवडी सुद्धा उचलली नाही .शत्रुमित्र, मान-अपमान ,सुखदुःख त्यांना एकसारखा वाटायचं.

अशा या महान योग्याचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ चा ! वर्‍हाडातील कोतेगाव नावाच्या छोट्याशा खेड्यात परटाच्या वस्तीमध्ये, झिंगराजी आणि सखुबाई या जोडप्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव डेबू ! सगळी मुलं वाढतात तसा वाढत होता .मुळात श्रीमंत असलेल्या झिंगराजी परीटाला देवा-धर्माच्या नावाखाली, संपत्ती बघून लोकांनी दारूचं व्यसन लावलं आणि भोळा झिंगराजी भुलला. दारूच्या व्यसनाने मृत्यू पंथास लागला .पण पश्चात्ताप होऊन मरतासमयी त्याने बायकोला सांगितले की ,”पोराची काळजी घे त्याला दारूचे व्यसन लागू नको देऊ बकऱ्यांचा बळी आणि दारूचा नैवेद्य लागणाऱ्या देवाचा नाद त्याला लागू देऊ नको मग तो देवाला न मानणारा झाला तरी चालेल.”

वडिलांच्या मृत्यूनंतर डेबू आई सखुबाई सह मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे गावी मामाकडे राहण्यास आला. डेबुजीला कामाची आवड. त्यामुळे गुरे चारण्याचे काम त्याने मनापासून स्वतःकडे घेतले आणि स्वच्छतेच्या आवड असल्यांने गुरांची स्वच्छता साऱ्या पाण्याची काळजी म्हाताऱ्या जनावरांना प्रेमाने वागवणे हे सगळं मनापासून करु लागला, त्याचवेळी त्याला भजनाचा वेड लागलं. आणि रानातल्या या गुराख्यांची भजनी मंडळ स्थापन झाले .रॉकेलच्या डब्याचा मृदुंग बनला आणि दगडाचे टाळ ! भजनाचा सप्ताह केला आणि भंडारा पण झाला. डेबुजीने मित्रांना सांगितले,” ह्या गरीब भाऊ-बहीण जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा निवद होईल !”

ईर्षेने डेबू पोहायला शिकला. आणि जिवावरचा प्रसंगही त्यांनी ओढवून घेतला होता. मुळात श्रीमंत असलेल्या चंद्रभानजी मामा सावकाराच्या पाशात अडकला कर्ज वाढत गेलं आणि सगळी जमीन सावकाराकडे गहाण टाकावी लागली, या धक्क्याने मामा मरण पावला. कुटुंबाची जबाबदारी आता डेबू वर आली .तो आता शेतकरी बनला. परंतु सावकाराने लावलेला खोटा हिशोब डेबूने स्पष्टपणे नाकारला, आणि मोठ्या निडरपणे जपती घालायला आलेल्या सावकाराला तोंड दिले.

मुलीच्या बारशाला पंचक्रोशीतल्या सगेसोयरे यांना गोडाचे जेवण दिले. पण कंदुरी आणि दारू नसल्याने लोकांना वाटले, की हे धर्माच्या विरुद्ध आहे त्याला टाकले पाहिजे. त्यावर ते शांतपणे लोकांना समजावले,” बाप्पा हो ! या आपल्या वेड्या समजुती आहेत बाकीच्या धर्माचे लोक कुठे दारू आणि कंदुरी देतात त्यांची पोरं नाही मरत ती !”

अशाच एका दुपारी आपल्या शेतामध्ये डेबूजी जेवत होता. तेव्हा एक साधू समोर येऊन बसला, आणि आपली ओळख सांगताना म्हणाला,” दुनिया मे रहने वाला हू !दुनिया को जगाता हू lअंधेरा दूर करता हुl “दुनियेत किती अज्ञान आहे भोळ्याभाबड्या समजूतीने लोक कसे जीवन जगतात त्यांना जागं केलं पाहिजे . “तुझको देखकर ही मेरा पेट भर गया है बेटा !”असं डेबूजीला म्हणाला. या घटनेमुळे साध्या शेतकऱ्याचा मार्ग बदलला, तो विचारात राहू लागला आणि एके दिवशी रात्री डेबूजीने गुपचूपपणे घर सोडले. बारा वर्षे सतत फिरत राहून समाजाचं निरीक्षण केलं .या हिंडण्याचा मुख्य उद्देश होता षडरिपु मारण्याचा .अनेक हाल सहन केले .दाही दिशांना मन मानेल तसे अंधार, उजड, डोंगर-दऱ्या, रान ,वस्ती, थंडी ,ऊन ,वारा ,पाऊस पायांची गती काही थांबली नाही आणि परोपकारी वृत्ती काही सुटली नाही. कुठे शेतात शिरून नांगर धरावा ,तर कापणी चालली असेल तर कापणी करीत सुटावं ,कोणी माऊली ओझे घेऊन चाललेली दिसली तर ओझे तिच्या गावी पोहोचवावे आणि कामाचा मोबदला आणायला कोणी घरात गेलती पसार व्हावं. या परोपकारी वृत्ती मुळे आणि डोक्याचे वाढलेले केस ,अंगावरचे कपडे फाटलेले, हाती खराटा, बगलेत गाडगे अशा वेषातला डेबुला कोणी” गाडगे बुवा” कोणी “लोटके महाराज” कोणी “चींधे बुवा “म्हणू लागले. हिंदुस्तानातील खेडे न खेडे बाबांनी पालथे घातले. स्वतःची स्वच्छता मोहीम सुरू असायची .गाडगेबाबांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी , गाडगेबाबांच्या सर्व मालमत्तेचा ट्रस्ट करून त्यांची चांगली व्यवस्था त्यांना लावून दिली. या व्यवस्थापन पत्रात अट होती की या धर्म शाळांवर खुद्द गाडगेबाबा, त्यांचे वारस किंवा त्यांच्या नात्यागोत्याचा कोणी माणूस यांचा अजिबात हक्क संबंध नाही आणि कुणीही असं सांगू लागले तर त्याला हुसकावून लावावे. इतकी निरिच्छता सार्वजनिक जीवनात कोठे शोधुन सुद्धा सापडायची नाही. नाशिकच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी पंतप्रधानांच्या भेटीचा मिळणारा योगही त्यांनी डावलला. ” त्यांना कशाला उगाच त्रास! त्यांना मोठी मोठी कामे असतात .त्यात आणखी हे कशाला त्यापेक्षा तुम्ही आपलं तुमचं काम करा ,आम्ही आपलं आमचं झाडू चालविण्याच काम करतो.” आणि खरच हे अधिवेशन संपेपर्यंत पटांगण साफ करण्याचे काम बाबांनी आपल्या पलटणच्या साह्याने केले.

बाबांनी काय केले नाही ? दारूबंदीसाठी धडपड केली. पशु हत्या थांबविण्यासाठी निर्वाणीचा प्रयत्न केला. देवांचे प्रस्त वाढवू नका जनताजनार्दन आत देव शोधा, अन्नछत्रे काढली ,धर्मशाळा बांधल्या, आंधळ्या-पांगळ्याना जवळ केले, दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवली. पाणी नसलेल्या ठिकाणी पाणपोया काढल्या . शिक्षणामुळे समाज परिवर्तन शक्य आहे त्यातून जगण्याचा अर्थ कळतो म्हणून अडाणी राहू नका, मुलाबाळांना शिकवा आणि रूढी प्रथा अंधश्रद्धा भोळ्या समजुती दूर सारून स्वच्छतेला महत्त्व द्या. ही त्यांची शिकवण.

फ्रेंड्स ! आजचा शिक्षण क्षेत्रातला धुमाकूळ, चुकीची शिक्षण पद्धती, चहुबाजूंनी वाढणारा कचरा, त्यामुळे वाढणारे प्रदूषण ,”माझा कचरा हो माझी जबाबदारी “हे म्हणण्यातला आपला दांभिकपणा हे बघितलं की वाटतं , आज गाडगे महाराज असते तर त्यांना काय वाटलं असतं ? आणि त्यांचे स्मरण आपण कुठल्या उजळमाथ्याने करायचं ? मूव्हीज मधील आवडत्या नायक नायिकांचे अनुकरण करून समाजामध्ये वाहणारे दारूचे महापुर, (महायज्ञ ?) बघितले की वाटतं, त्यांचा खराटा आपल्या सगळ्यांच्या हाती घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. तरच गाडगे महाराजांनी केलेल्या सत्कार्याचे चीज होईल !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER