ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

Shalv Kinjavdekar

घर कितीही मोठं असो किंवा छोटं , प्रत्येकाची त्याच्या त्याच्या घरातील एक खास जागा असते, जिथे कितीही कंटाळून आल्यानंतर आपण त्या आपल्या स्पेसमध्ये गेलो की कंटाळा विसरून जातो. मग ती घरातली गच्ची असेल किंवा घरातला कुठलाही कोपरा असेल. असं म्हणतात की मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांसाठी मालिकेचा सेट हे त्यांचे दुसरे घरच असतं. मग जशी घरातही एक जागा असते तशी या मालिकेच्या सेटवरदेखील प्रत्येक कलाकार रिकामा वेळ घालवण्यासाठी आपापली जागा तयार करत असतो. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचा नायक शाल्व किंजवडेकर यानेही या मालिकेच्या सेटवर असा एक स्वतःचा कोपरा काबीज केला आहे की जिथे सीन नसतो किंवा ब्रेक असतो तेव्हा त्याला कुठेही शोधायचं असेल तर तो नक्की त्या जागेवर असणार. आता हे सेटवरच्या प्रत्येकाला इतकं सवयीचं झालं आहे की प्रत्येकाने हे जाहीरच करून टाकलं की ती जागा म्हणजे शाल्वची प्रॉपर्टी आहे. इतकं करुन सगळे थांबले नाही तर शाल्वने या मालिकेच्या सेटवर त्याची जी प्रॉपर्टी तयार केलेली आहे त्यावर आता एक असा बोर्ड लावण्यात आलाय ज्यावर असे लिहिले आहे की ही शाल्व किंजवडेकर यांची प्रॉपर्टी आहे. यावर कोणीही आपला हक्क सांगितल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल . सध्यातरी शाल्वने मालिकेच्या सेटवर तयार केलेली ही जागा आणि हा बोर्ड चर्चेचा विषय बनला आहे.

येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील वजनाने जाड असलेली मुलगी आणि एक गर्भ श्रीमंत कुटुंबातील अत्यंत फिटनेसप्रेमी आणि देखणा मुलगा यांच्यातील मैत्री आणि मग त्यांचे प्रेम अशी ही कथा आहे . सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली आहे. मालिकेमध्ये ऑन स्कीन जरी सध्या टेन्शन सुरू असले तरी या सेटवर ऑफ कॅमेरा नेहमी धमालमस्ती सुरु असते. मालिकेची नायिका अन्विता फलटणकरला प्रत्येकाची फिरकी घेण्याची सवय आहे. मालिकेच्या सेटवर शाल्वने निवडलेली खास जागा आणि त्यावर लावलेला बोर्ड या सगळ्याच्या मागे अन्विताच डोकं आहे. ती सतत कुणाची तरी फिरकी घेत असते आणि प्रत्येकाला तिने काहितरी नावं दिलेली आहेत. मालिकेच्या सेटवर शाल्वची जी खास जागा आहे त्यावर बोर्ड लावण्याची कल्पना अन्विताच्या सुपीक डोक्यातून आली. सेटवरच्या सगळ्याच कलाकार आणि तंत्रज्ञान टीमने पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी मिळून शाल्वच्या या जागेच्या वरती एक बोर्ड लावून मालिका संपेपर्यंत ही जागा शाल्वची प्रॉपर्टी असेल असं जाहीर करून टाकले आहे.

सध्या अनेक मालिकांच्या सेटवर काय काय धमाल मस्ती सुरु असते हे त्या मालिकेतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. चाहत्यांनाही मालिकेमध्ये कलाकारांची केमिस्ट्री बघायला आवडतं तसं सेटवर या सगळ्या कलाकारांची कशी धमाल सुरू असते हे बघायलाही नेहमीच आवडतं. त्यामुळे अशा व्हिडिओ ना चाहत्यांकडून खूप पसंती मिळत असते. यानिमित्ताने शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी एक गप्पांचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि ज्यामध्ये हा किस्सा सांगितला. मालिकेच्या सेटवर कोण जास्त त्रास देतो या मुद्द्यावर या गप्पांमध्ये चर्चा सुरू होती. अर्थातच शाल्वने अन्विताकडे बोट दाखवून ही सगळ्यांना त्रास देते असं सांगितलं. अर्थात तिचा त्रास आम्हाला सगळ्यांनाच आवडतो असंही त्याने सांगितलं. नेमका अन्विता काय त्रास देते हे सांगत असतानाच शाल्वने त्याच्या मालिकेतल्या सेटवर असलेल्या त्या जागेविषयी आणि त्या जागेवर लावलेल्या हटके बोर्ड विषयी सांगताच मालिकेच्या सेटवर देखील हशा पिकला.

शाल्व सांगतो, ही मालिका जितकी ऑनस्क्रीन बघायला छान वाटते तितकीच आम्हाला एनर्जी देणाऱ्या गोष्टी या मालिकेच्या सेटवर घडत असतात. त्यामुळेच आम्ही उत्साही असतो. एकमेकांची चेष्टा करून एकमेकांशी मजा करणं हे सगळं आम्ही खूप उस्फूर्तपणे घेत असतो. मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे मला दुपारी साधारण एक ते चार मध्ये खरंच खूप झोप येते पण सध्या मालिकेचे शेड्युल इतका टाईट आहे की मला कितीही झोप आली तरी मी कंट्रोल करतो आणि सतत फ्रेश दिसण्यासाठी आमचीही धमाल-मस्ती सुरू असते.पण जेव्हा मला ब्रेक असतो किंवा माझा सीन नसतो तेव्हा सेटवर एक असा कोपरा आहे जिथे एक साधी खुर्ची तिथे मी बसलेलो असतो .

आता मलाही त्या जागेची इतकी सवय झाली आहे आणि मी तिथे बसण्याची प्रत्येकालाच इतकी सवय झाली आहे की त्याचा फायदा घेऊन त्या जागेतील भिंतीवर असा बोर्ड लिहिला की ही प्रॉपर्टी शाल्वची आहे आणि ह्या प्रॉपर्टीवर कोणीही आपला हक्क सांगितल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण अशी धम्माल करताच एकत्र काम करण्यात एक वेगळी मजा असते त्यामुळे अशा प्रकारच्या धमाल मस्ती ची आम्ही सगळेच नेहमीच आनंद घेत असतो.

शाल्व किंजवडेकरची नायक म्हणून ही पहिलीच मालिका आहे आणि त्याच्या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हंटर या सिनेमापासून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली . बहुचर्चित आणि माधुरी दीक्षित अभिनीत बकेट लिस्ट या सिनेमातही शाल्वची भूमिका होती. मला काही सांगायचंय या मालिकेत शाल्वने अभिनय केला होता. पण, येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेने शाल्वला चॉकलेट हिरो म्हणून छोट्या पडद्यावर आणले आहे. भटकंती करणे आणि बाईक वरून लाँग राइडला जाणं हे आवडते छंद आहेत . सध्या त्याच्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम या भूमि केबरोबरच त्याने मालिकेच्या सेटवर छोटीशी का असेना जी प्रॉपर्टी केली आहे त्याचीही चर्चा जोरात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER