‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही’, शिवसेनेचा फडणवीसांना भावनिक सल्ला

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि तत्सम उपाययोजनांना विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचेनेते(BJP) देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील. मंगळवारी एकटय़ा नागपुरात ५४ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही, असा भावनिक सल्ला शिवसेनेने आजच्या सामनातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे (Shiv Sena’s emotional advice to Fadnavis).

आजचा सामनातील अग्रलेख…

लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर सरकारला कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने कडक पावले उचलली तर विरोधी पक्ष तांडव करणार. विरोधी पक्षाने तांडव केले तर त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार. त्यामुळे ‘लॉक डाऊन’, ‘टाळेबंदी’ नको असेल तर जनतेने बेदरकारपणे जगणे तूर्त सोडावे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, सिनेमा, पर्यटनाचा आनंद सगळय़ांनाच हवा आहे, पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. आधी जीव वाचवा इतकेच आम्ही सांगू शकतो.

राज्याला पुन्हा लॉक डाऊन परवडणारा नाही, असे सरसकट सगळय़ांचेच म्हणणे आहे व ते योग्यच आहे. महाराष्ट्रात सध्या रोज पंचवीस हजारांवर कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत पाच-सहा हजार रोजचा आकडा आहे. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाटा नाहीत. हे चित्र तरी राज्याला परवडणारे आहे काय? राज्यात कोरोनाच्या संक्रमणास लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉक डाऊनचे संकेत दिले आहेत. त्या लॉक डाऊनवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. ‘महाराष्ट्रात लॉक डाऊन कराल तर याद राखा. रस्त्यांवर उतरू,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लॉक डाऊन नकोच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल सांगत आहेत. लॉक डाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्याची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉक डाऊन गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्यच आहे. टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारे नाही.

लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे. ‘गेला गेला कोरोना गेला आहे’ असे मानून लोकांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली. त्यात मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे नाही. ग्रामीण भागात तर जे लग्न समारंभ साजरे केले गेले त्यात हजारोंची गर्दी करून लोकांनी कोरोनासाठी पुन्हा पायघडय़ाच घातल्या. ‘आम्हाला काय कुणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेतून कोरोना वाढतच गेला. पुन्हा कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकीर मंडळींना दुश्मन वाटू लागतात. रुग्ण संख्या वाढू लागल्याने सरकारने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. लसीकरण वाढवले आहे. महाराष्ट्रात लॉक डाऊन नसला तरी रात्रीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्याच लागतील. नांदेडच्या गुरुद्वारातील एका कार्यक्रमावर निर्बंध लावताच आक्रमक जमावाने तलवारी नाचवत पोलिसांवर हल्ला केला. महाराष्ट्रात लोकांनी होळी-रंगपंचमी साजरी केली नाही, गणपती-दिवाळी साजरी केली नाही. होला-मोहोल्ला हा शीख बांधवांचा उत्सव असतो. त्यावर बंधने आणली ती कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळेच. उत्तर प्रदेशात मथुरेत-वृंदावनात लाखो लोकांनी होळीचा सण साजरा केला. त्यांना कोरोना होत नाही. मग आम्हालाच कसा होईल? हे तर्कट चुकीचे आहे.

प. बंगालातील प्रचारसभेत हजारोंची गर्दी होतेच. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘विना मास्क’ रोड शोचे शक्तिप्रदर्शन होत आहे. मग महाराष्ट्रातच लॉक डाऊनचा विचार का करता? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील रोज वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या आकडय़ात आहेत. एकंदरीत देशातच कोरोनाची स्थिती वाईटाहून अधिक वाईट झाली आहे. याक्षणी देशात केविड रुग्णांची संख्या दीड कोटीच्या आकडय़ात पोहोचली आहे. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. या दहातील आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, नांदेड, नगर या शहरांनी कोरोनात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकटय़ा नागपुरात ५४ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button