धिस इज नॉट माय कप ऑफ टी

This is not my cup of tea

मला न काहीतरी करायचं आहे, पण नक्की काय करावं हे समजत नाही ! किंवा खूप गोष्टींची हौस आहे हो मला ! पण नेमकं काय करावं कळत नाही .अशा प्रकारचे उद्गार माझ्या व्यवसायात खूपदा ऐकायला मिळतात तेव्हा मी त्या मागची कारणे शोधायचा प्रयत्न करते. बहुतेक असे उद्गार कोणाकडून येतात तर सुशिक्षित तरुण तरुणी किंवा आपापल्या नोकरी व्यवसायात अपयश बघितल्यानंतरच्या अवस्थेतील व्यक्ती किंवा थेट मुले मोठी झाली ,घरचा व्याप कमी झाला आता अचानकच रिकामपण खायला उठत आहे ,अशा वयोगटातील स्त्रिया .अशांकडून हे मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं.

बहुतेक किशोरवयीन किंवा युवक मुलं-मुली काहीतरी ध्येय डोळ्यासमोर धरुन शिकतात .त्यामुळे त्यांच्या करिअरचा मार्ग निश्चित असतो .पण काही असेही असतात की प्रवाह जसा येईल तसे वहावत गेलेले. फारशी काही चौकशी न करता शिक्षण घेतलेले .पालकांना देखील कुठलाही दृष्टीकोन नाही किंवा कुठलही मार्गदर्शन नाही. असेही विद्यार्थी बरीच असतात .अशा प्रत्येकाला प्रश्न पडतो मला काहीतरी करायचंय काय करायचं माहीत नाही.

बरं काहीतरी करायची इच्छा असते .पण मग त्या दृष्टीने काही पावले उचलावी लागतात, माहिती मिळवावी लागते किंवा आधी आपल्याला कराव्याशा वाटणार्‍या दहा गोष्टींची यादी केल्यावर अापल्याला त्यापैकी निश्‍चितपणे कोणत्या गोष्टींची आवड आहे हे बघायला लागते. फक्त आवड, इच्छा, ज्ञान असून उपयोग नसतो ,तर ते वास्तवात उपयोगात आणण्यासाठी आवश्यक शारीरिक, मानसिक ,भावनिक सज्जता माझ्याकडे पुरेपूर आहे का? आर्थिक दृष्ट्या मला ते परवडणार आहे का?आणि त्यासाठी लागणारा वेळ आणि साधन मला उपलब्ध आहेत का ? या सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार करावा लागतो.

वर उल्लेख केलेल्या वर्गवारी मध्ये अशी स्थिती कोणत्या कारणाने येऊ शकते याचाही विचार केला. जेंव्हा समोर येणाऱ्या परिस्थितीला, अनुरूप काही बंधनं येऊन पडतात. मुली लग्नानंतर करिअर किंवा नोकरी थांबवतात. मुले मोठी झाल्यावर किंवा थोडा सुटवंगपणा आल्यावर बरीचशी असलेली कौशल्य अपडेट करावी लागतात. कामाच्या पद्धती ,गरजा बदललेले असतात. पूर्वीच्या शिक्षणावर आता संधी फार मिळत नाही. आणि मग आता मी नेमकं काय करू असा प्रश्न पडतो.

काही सोयी ग्रामीण भागात उपलब्ध नसतात. मग ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आजकाल सगळीकडेच मिळतं. बीएड डीएड केलं जातं आणि शिक्षकाची नोकरी स्वीकारली जाते किंवा शेती केली जाते. असे खूप लोक माझ्या परिचयात आहेत, जे भरपूर हुशारी असलेले आहेत, बरेच काही करू शकले असते असे काहीजण खरंच स्वखुशीने हा मार्ग निवडतात का ? काही जणांची ती आवड ही असू शकते. पण इतरांनी “दिस इज माय कप ऑफ टी ?” हा प्रश्न स्वतःला विचारलेलाच नसतो. असही वाटतं.

बरेचदा आपल्या स्वतःची नीट ओळख करून न घेतल्याने आपले गुणदोष कौशल्य मर्यादा यांचा विचार केलेला नसतो .फक्त लोक काय म्हणतात ? काय बोलतात माझ्याविषयी ? यावरही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ लहानपणी आपण खूप सुंदर ड्रॉइंग काढत असू रांगोळ्या काढत असू. लोकांच्या ते लक्षात असतं आणि लोक आपल्याला कलाकार समजतात. काळाच्या ओघात आज जर मला एकही रांगोळीची रेघ सरळ काढता येत नसेल कदाचित किंवा एका वेळी दोन-दोन तास खाली मांडी घालून बसणे जमत नसेल तर मी रांगोळी किंवा मेहंदी काढण्याचा व्यवसाय कसा निवडेन ? बरेच दिवसांचा रियाज नाही, आवाज हलतो आहे , ताल तर भलतीकडेच जातो. अशावेळी मी स्टेजवर गाणं परफॉर्म करण्यात हिम्मत करावी का ? हो ! हौस म्हणून मी या गोष्टी करू शकेन पण कदाचित पण परफॉर्मन्स ? पण मला माझ्या सध्याच्या क्षमता आणि गुणांचा विचार करावा लागेल.

मुख्य म्हणजे इच्छा असणे आणि प्रत्यक्ष कृती किंवा करता येणे यामध्ये खूप अंतर असते. आमच्याकडे येणाऱ्या क्लायंटला नेहमीच हे सांगावे लागते. मलाही करायची खूप इच्छा आहे मॅडम पण कळत नाही काय करायचं ? किंवा इच्छा आहे हो पण ! या पण वर गाडी का थांबते ? यात क्लायंट बाबत बोलायचं तर त्यांचे आजारपण आणि त्याचा संघर्ष या गोष्टीला आडवा येत असतो. सातत्य राखणे त्यांना अशक्य होते.

दुसरी गोष्ट एखादे काम करायला किती गोष्टींचे नियोजन करावे लागते, मेहनत करावी लागते याची जाणीव नसणे किंवा ते न जमणे. साध्या गोष्टी करण्यासाठीसुद्धा उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा, दैनंदिन इतर कामे, म्हणजे नोकरी व्यवसाय शिक्षण यांच्या बरोबरीने प्रचंड इच्छाशक्तीचा नेट लावावा लागतो.

त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा खूप काही करावसं वाटतंय त्यावेळी “काय कराव यापेक्षा काय करू नये “याची ओळख व्हावी लागते . माझी एक मैत्रीण आहे. अतिशय उत्तम आर्थिक परिस्थिती असलेली. सुरुवातीपासून कुठलेही करिअर किंवा छंद न जोपासलेली. पण दुर्दैवाने तिचे मिस्टर गेले .आणि एक मोठी पोकळी तिच्या समोरील निर्माण झाली. एकुलत्या एक मुलीचे लग्न झालेले. अशा वेळी तिला खूप प्रश्न पडला होता की काय करू ? त्यावर खूप चर्चा केल्या की काय करू शकते. मला वाटायचं की मी किती पर्याय सांगितले पण तिला नाही आवडत आहेत. मग लक्षात आलं की तिला प्रवासाची, फिरण्याची, पर्यटनाची खूप आवड आहे. सुदैवाने जवळ पैसाही आहे. आता तिने तो छंद जोपासला आहे. आनंदात आहे. कारण तिने मनाशी ठरवलं असावं, की” धीस इज नॉट माय कप ऑफ टी !”हा विचार आपला आपण करावा लागतो.

बरेचदा अनेक गोष्टी इतरांच्या अनुकरणाने केल्या जातात. वजन कमी करायचं असतं. मग कोण काय काय करतो त्याची चर्चा होते. मग थोडे दिवस ,काही महिने” आम्ही दीक्षित करतोय” असे ठरवून दिवसभरात जे जे काही “खाणेबल “घरांमध्ये बनले असेल, ते सगळे जमा करून जेवणात खाल्ले जाते, परिणाम दिसत नाही. मग चार वेळा खाऊ शकतील,असा दिवेकर प्लॅन कोणीतरी सांगतो आणि काही महिने त्याचे प्रयोग सुरू राहतात . तेवढ्यात पुढे कुणीतरी दामले प्लान घेऊन येतो.

पण यापैकी माझ्या तब्येतीला काय मानवणार आहे ? माझ्या सवयी कशा आहेत ? याचा विचार केल्या जात नाही आणि आंधळे अनुकरण चालू राहत .हे फक्त डाएट बाबतच नाही तर सगळ्याच बाबतीत हीच कथा !

काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना अनेक विषयात रुची असली तरीही आपले दररोजचे रुटीन सांभाळून त्या या सगळ्या आवडींना न्याय देऊ शकत असतात. ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन ‘ असण्यामध्ये वाईट काही नाही. पण मी नेमकं काय करू? हा भुंगा मात्र नको.

माझ्या एका मैत्रिणीची पॉलिसी मला खूप आवडली. ती नुसतीच कोरोनामधून बाहेर आली. स्वतःच्या पंचवीस वर्षांच्या फिरायला जाण्याच्या सवयीबद्दल ती म्हणाली, मी मध्ये जिम पण जॉईन केला, पण फार शिस्त न मानवणाऱ्या मला ते वेटलॉस, डायटप्लॅन वगैरे काही जमणार नव्हतं. त्याचवेळी मी ठरवून टाकलं, ” धिस इज नॉट माय कप ऑफ टी !”

असो ! जर हा माझा प्रांत नाही हे आपण चटकन ओळखू शकलो ना, तर आपले निर्णय चुटकीसरशी होतील. फक्त त्यासाठी स्वतःमध्ये डोकावून बघायला हवं खरं खरं ! आणि मग माझा निर्णय तो फक्त माझा असेल !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरापिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button