ही तर नुसती सुरुवात आहे… दुसरा भाग आहे अत्यंत महत्त्वाचा; फडणवीस यांचा टोमणा

CM Uddhav Thackeray - Sachin Vaze - Devendra Fadnavis - Maharashtra Today

पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटके, त्या घटनेत वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी पोलिसांचीच निघणे व या प्रकरणात संबंध असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) टोमणा मारला – आता तर नुसती सुरुवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे; दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचे मुंब्रा येथे शव आढळलेले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपाने (BJP) आक्रमक होत या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. काल दिवसभराच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे.

पुणे येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, याचे काही पुरावे माझ्याजवळ आले. मी ते सभागृहात यासाठी मांडले की, पोलीसमधीलच लोक अशा प्रकारे काम करणार असतील, अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? म्हणून हा सगळा विषय मी सतत मांडत होतो. परंतु दुर्दैवाने सरकार केवळ त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत होते. वाझेंची वकिली करण्याचे काम सरकार करत होते. मला वाटते की, एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. कशा प्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे हेदेखील उघड झाले आहे.

माझे मत असे आहे की, अजून यातला एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची हत्या. आता, ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा गुन्हा आहे. त्या संदर्भात आज एनआयएने वाझेंचा रिमांड मिळवला आहे. मनसुख हिरेन हत्याप्रकरणदेखील महत्त्वाचे आहे. त्यात महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे तपास यंत्रणांना सापडत आहेत. त्यातही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणालेत.

हे केवळ सचिन वाझे यांच्या पुरते मर्यादित नाही
फडणवीस म्हणाले, “ हे केवळ सचिन वाझे यांच्यापुरते मर्यादित नाही. यामध्ये कोण कोण आहे? कोणाला पाठिंबा आहे? कुणी कुणी या प्रकरणात काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर उघड होणे आवश्यक आहे. आता ही नुसती सुरुवात झाली आहे.  सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खाते होते, त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आग्रह धरला होता की, वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले पाहिजे. मी अॅडव्हकेट जनरल यांचा सल्ला घेतला.  त्यांनी सल्ला दिला की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना सेवेत घेणे योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल.

मात्र, हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचे कारण दाखवून कोरोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असे कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतले. क्राईम इंटलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचे सगळ्या महत्त्वाचे  युनिट आहे. या युनिटचा प्रमुख नेहमी पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो. वाझे यांना सेवेत घेतल्यानंतर रातोरात पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीची बदली करण्यात आली आणि एपीआय दर्जाचे सचिन वाझे यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला! त्यानंतर मुंबईमधील प्रत्येक केस त्यांच्याचकडे जाईल, असे काम सुरू झाले. वाझे यांचे प्रस्थ वाढत गेले. त्यांना सरकारचा भक्कम पाठिंबा होता तो ते शिवसैनिक होते म्हणून होता की काय मला माहीत नाही. यामुळे त्यांना असे वाटले की, आपण काहीही करू शकतो; या मानसिकतेमधून हे काम झाले असावे, असे मला वाटते. या संदर्भात अजून पुढे भरपूर कारवाई होण्याची अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER