
राजकारणात काहीही पर्मनंट नसतं तसं आता पक्षांतरं सुरू झालीत. भारतीय जनता पक्षाचे जुने नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यापाठोपाठ आता जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) गेले. जयसिंगराव म्हणालेत की, चांगल्या कार्यकर्त्याचं भारतीय जनता पार्टी वाळवंट करते. दुसरीकडे दक्षिणेतल्या अभिनेत्री तारका विजयाशांती भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येताहेत. कुणी तरी त्यांना जाऊन सांगायला हवे की, तुमचं वाळवंट होऊ शकतं बरं का !
जयसिंगराव गायकवाड यांनी दीड तप भाजपामध्ये काढलं आणि ते काढत असताना त्यांना आपलं वाळवंट होतंय हे लक्षात आलं नाही. आयुष्यात ‘संध्याछाया भिवविती हृदया’ अशी अवस्था होते तसं हा संघर्षासाठी प्रसिद्ध असलेला मराठवाड्याचा सुपुत्र वाळवंटातून पुन्हा स्वर्ग निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलाय. कालपरवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. तेही पवार हे छोटे नेते असल्याचे मत व्यक्त करून. पवार यांचा अभ्यास नसतो, हेही आपल्याला राजकारणात आल्यावर समजले, असंही पाटील म्हणालेत.
त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ले चढवलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील वाट्टेल ते बरळताहेत असं नमूद केलं आणि शरद पवार गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात योगदान देत आहेत, असंही सांगितलंय. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि आताही पवारसाहेबांचा सल्ला घेतात; किंबहुना त्यांच्या शब्दाला आजही राष्ट्रीय राजकारणात खूपच वजन आहे, असंही राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांचं मत आहे. जयसिंगराव काय किंवा राष्ट्रवादीचे विविध नेते काय, त्यांनी पवारसाहेबांची बाजू घेणं, भाजपाला शिव्या देणं, हे योग्यच आहे. गोपीचंद पडळकर हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
पण त्यांच्या विधानात तर्क आहे. चार-सहा खासदार निवडून आणणारे लोकनेते असतील तर तीनशेच्या वर खासदार आणणारे नरेंद्र मोदी यांना काय म्हणायला हवे, हा पडळकर यांचा सवाल आहे. नारायण राणे यांच्या सुपुत्रानेही पवारसाहेबांच्या नातवाच्या रोहित पवार यांच्या ट्विटवर टीका केलीय. घरात बसून पॉपकॉर्न खात सचिन तेंडुलकरवर टीका करणाऱ्या मित्राशी चंद्रकांत पाटील यांची तुलना रोहित पवारांनी केलीय. आपल्याला त्या मित्राची आठवण आली आणि हसू आलं, अशा शब्दात रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय.
त्यावर राणेपुत्राने संपूर्ण पवार कुटुंबाला साखर कारखानदारीपुरते मर्यादित करून टाकलेय. चंद्रकांत पाटील यांनी या सर्व टीकेला उत्तर देताना अजित पवार जनतेच्या प्रश्नावर बोलायला वेळ काढू शकत नाहीत; पण पवारसाहेबांवरच्या टीकेला उत्तर देताना मात्र वेळकाढतात, असं पाटील यांनी नमूद केलंय. पहाटेची शपथ गेले दोन दिवस सोशल मीडियात गाजतीय; पण त्यावर अजित पवार यांना बोलणं अवघड आहे आणि पवारसाहेबांच्या समर्थनासाठी धावलेल्यात पवारसाहेबांना हिमालय असं संबोधणारे अमोल कोल्हेही आहेत.
पूर्वी सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावायचा; पण आता साहेबच हिमालय झाल्याने त्यांच्या मदतीला स्थानिक विंध्य पर्वत वगैरे धावू लागलेत. आणि एक प्रश्न उरतोच, साहेब हिमालय तर मोदी कोण? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही सारी विधानं होत आहेत. त्यामुळे त्या सर्व विधानांकडे निवडणुकीच्या वेळी केली जाणारी टीका टिप्पणी म्हणून बघायला हवं. कारण एकदा निवडणूक संपली की तुझ्या गळा माझ्या गळा… असंच चित्र दिसेल.
शैलेंद्र परांजपे
Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला