…हा देखील तिरंग्याचाच अपमान आहे, साहेब! शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना टोला

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई : लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी? असा सवाल करत शिवसेनेने (Shiv Sena) सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले .

लाल किल्ल्यावर शेतकऱ्याच्या एका गटाने गोंधळ घातला होता. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेनेने टीका केली आहे .

आजचा सामनातील अग्रलेख :
26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे’ असं म्हणत सेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडले.

तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांची पोरे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात? असा सवालही सेनेनं मोदी सरकारला विचारला.

निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत? शेतकऱ्यांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱ्यांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे. सरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱ्यांनीच केला आहे काय? असा थेट सवाल शिवसेनेने विचारला.

शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या सशस्त्र फौजा उभ्या केल्या गेल्या आहेत. लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. डांबरी रस्त्यांवर खिळे मारून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत पुन्हा येऊ नये म्हणून काय हा कडेकोट बंदोबस्त! हे सर्व कठोर प्रयोग लडाखच्या सीमेवर केले असते तर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून आपल्या बापाचीच जमीन असल्यासारखे बसून राहिले नसते. चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हा देखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब!, असा सणसणीत टोला सुद्धा शिवसेनेने मोदींना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER