गोलंदाज तोच व क्षेत्ररक्षकही तोच अशी ही अनोखी हॅट्ट्रिक

Michael Rae

क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक (Cricket Hattrick) हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो. लागोपाठच्या तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना कुणी बाद केले, कसे बाद केले याबद्दल कुतूहल असतेच. क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक हा काही अगदीच नवीन विषय नाही. आतापर्यंत भरपूर हॅट्ट्रिक झाल्या आहेत; पण त्यातील काही विशेष ठरल्या आहेत. या खास हॅट्ट्रिक कायम स्मरणात राहणार आहेत. अशीच एक स्पेशल हॅट्ट्रिक दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये (New Zealand) नोंदली गेली आहे. स्पेशल यासाठी की यात एका गोलंदाजाने लागोपाठच्या तीन चेंडूवर तीन फलंदाज बाद तर केलेच; पण त्या बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेलसुद्धा एकाच क्षेत्ररक्षकाने (यष्टिरक्षक सोडून) घेतले. या प्रकारे गोलंदाज तोच आणि क्षेत्ररक्षकही तोच अशी अनोखी हॅट्ट्रिक नोंदली गेली.

न्यूझीलंडमधील प्लंकेट शिल्ड (Plunket Shield) स्पर्धेच्या सामन्यात ओटॅगो (Otago) संघाचा गोलंदाज मायकेल रे (Michael Ray) व क्षेत्ररक्षक डेल फिलिप्स (Dale Philips ) यांनी मिळून ही हॅट्ट्रिक साजरी केली. ड्युनेडिन येथील सेंट्रल डिस्ट्रिक्टविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी हा पराक्रम केला. न्यूझीलंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही ४९ वी पण आधीच्या ४८ पेक्षा अगदी वेगळी हॅट्ट्रिक ठरली. तिन्ही फलंदाज मायकेल रेचा चेंडू फ्लिक करण्याच्या नादात शाॕर्ट लेगच्या जागी उभ्या डेल फिलिप्सच्या हाती झेल देऊन परतले.

पहिला फलंदाज बाद झाला तो डेन क्लिव्हर. त्याचे शतक फक्त एका धावेने हुकले. पुढल्या चेंडूवर जोश क्लार्कसन बाद झाला तर ब्लेयर टिकनरच्या बाद होण्याने मायकेल रे व डेल फिलिप्स या दोघांचीही हॅट्ट्रिक पूर्ण झाली.

डेन क्लिव्हर झे. फिलिप्स गो. रे – ९९
जोश क्लार्कसन झे. फिलिप्स गो. रे – ०
ब्लेयर टिकनर झे.फिलिप्स गो. रे – ०

अशी ही हॅट्ट्रिक नोंदली गेली.

रे-फिलिप्स जोडीने आणखी एक फलंदाज- जेदेन लेनाॕक्स यालासुद्धा बाद केले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तोच फलंदाज व तोच गोलंदाज अशा प्रकारची ही केवळ पाचवी हॅट्ट्रिक ठरली. या खास हॅट्ट्रिक अशा….

झे. जी थाॕमसन, गो.एस. स्मिथ -१९१४
झे. सी.व्हाईट, गो. आर.बीस्ली – १९४६
झे. अली वकास, गो. समीउल्ला खान –२०१४
झे. एम.ट्रैस्कोथीक, गो. सी. ओव्हरटन – २०१८
झे. डी. फिलिप्स, गो. एम. रे – २०२१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button